थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड

Published on

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
अलिबाग (वार्ताहर) : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हाभरातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी दिली आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी शिक्षकदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जिल्ह्यातील १७ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यातील मनोहर पाटील यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, पेण तालुका किशोर पाटील, पनवेल तालुका योगिनी वैदू, कर्जत संज्योती कांबरी, खालापूर तालुका कीर्ती धारणे, उरण तालुका अजित जोशी, सुधागड तालुका वृषाली गुरव, रोहा तालुका प्रसाद साळवी, महाड तालुका वसंत साळुंखे, श्रीवर्धन तालुका सीमा चव्हाण व नारायण खोपटकर, म्हसळा तालुका शशिकांत भिंगारदेव, पोलादपूर तालुका विजय पवार, माणगाव सुजाता मालोरे व परेश अंधेरे, तळा तालुका उल्का मोडकर, मुरूड तालुका हेमकांत गोयजी यांना जिल्हा आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
..................
स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
अलिबाग (वार्ताहर) ः शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त अलिबागमध्ये शेतकरी भवन येथे शनिवारी (ता. १३) जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना राज्यमंत्री स्व. मीनाक्षी वक्तृत्व करंडक २०२५ देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत स्थानिक प्रश्नांचे राज्यस्तरीय नेतृत्व मीनाक्षी पाटील, येवा कोकण आपलोच आसा-पण विकासाचे काय?, सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे, संघर्षातून आत्मनिर्भरतेकडे, नफरत के बाजार मे मोहोब्बत बेच रहा हूं मै, सकारात्मक बदलाची सुरुवात-व्यक्तीच्या प्रयत्नातून समाजापर्यंत, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख रक्कम ११ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम आठ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला रोख रक्कम पाच हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला रोख रक्कम तीन हजार रुपये व चषक तसेच पाचव्या क्रमांकाला रोख रक्कम दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकी एक हजार रुपये व चषक अशी पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी वेदांत कंटक (८३२९७७५५३१), हर्ष ढवळे (९७३०८१७२२७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
................
निसर्गाशी नाळ जुळवून ठेवण्याची गरज : प्रसाद गावडे
रोहा, ता. ४ (बातमीदार) ः कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे याच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. ही मुलाखत रोहेकरांसाठी अतिशय सुंदर, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी ठरली. प्रसाद गावडे यांनी आपल्या अनुभवातून पारंपरिक शेतीचे महत्त्व, तसेच इको-टुरिझमच्या माध्यमातून तरुणांना कोकणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करीत निसर्गाशी नाळ जुळवून ठेवण्याची गरज आहे, असे मौलिक विचार प्रसाद गावडे यांनी नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यक्त केले. रोहा सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या वतीने बुधवारी (ता. ३) भाटे सार्वजनिक हॉल येथे आयोजित विशेष कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. नियोजित कार्यक्रमाप्रसंगी आपले विचार मांडत असताना प्रसाद गावडे यांच्या प्रत्येक विचारातून निसर्गप्रेम, परंपरेबद्दलची जाणीव आणि पुढील पिढ्यांसाठी काहीतरी सकारात्मक उभारण्याची तळमळ स्पष्ट दिसून आली. त्यांच्या जीवनप्रवासातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या मुलाखतीची धुरा कुणाल साळुंखे यांनी पार पाडली. विचारपूर्वक घेतलेल्या प्रश्नांमुळे संवाद अधिक रंजक व ज्ञानवर्धक झाला. त्यामुळे हा कार्यक्रम आणखी खुलून, रोचक झाला. उपक्रमाला रोहेकरांनी मोठ्या उत्साहाने आणि भरभरून प्रतिसाद दिला. या मार्गदर्शनपर संदेशातून प्रत्येक प्रेक्षकाने प्रेरणा घेत, कोकणाच्या मातीशी नाळ घट्ट करण्याची भावना मनाशी नक्कीच बाळगली असणार, यात तीळमात्र शंका नाही, अशी भावना सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे अध्यक्ष अमेय अविनाश जोशी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले नितीन पिंपळे यांचादेखील यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे यश ओंकार, अध्यक्ष अमेय जोशी, चरण शिर्के, रविराज मेहेंदळे, चैतन्य भावे, शिवराज भांड, सायली कुलकर्णी, नितीन पिंपळे, चंद्रकांत पार्टे, सोहम बारटक्के, प्रेषित बारटक्के, सुयोग शेळके, ओमकार गुरव, नीलेश शिर्के, स्वरांजली शिर्के, सुखद राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
........
झेप फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
पोयनाड (बातमीदार) : स्व. मीनाक्षी पाटील यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील झेप फाउंडेशनच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उदयोन्मुख वक्त्यांच्या वक्तृत्वाला संधी मिळावी आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळी १० वाजता दूध डेअरी सभागृह पेझारी येथे ही जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. १८ वर्षांपुढील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धकांना एकूण सात मिनिटे भाषण करण्यासाठी वेळ देण्यात आला असून प्रथम येणाऱ्या ३० स्पर्धकांनाच या स्पर्धेसाठी प्रवेश दिला जाणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे विषय कृषी संस्कृतीची दशा आणि दिशा, पर्यावरण संवर्धन : माझी जबाबदारी, सायबर क्राईम आणि आत्मभान, कृत्रिम बुद्धिमत्ता : भविष्याचा वेध, औद्योगिकीकरण, पर्यटन क्षेत्राद्वारे महिलांचे सबलीकरण असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहेत. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास १५ हजार रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांक १० हजार रोख व स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक सात हजार रोख व स्मृतिचिन्ह, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी तीन हजार रोख व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यायचा आहे त्यांनी डॉ. भटू वाघ (९४२११६३०८०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
...........
तळा पोलिस ठाण्यात गणेशोत्सवात सर्वधर्मसमभावाचा संदेश
तळा (प्रतिनिधी) ः तळा पोलिस ठाण्यात गणेशोत्सव साजरा करताना सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश दिला जात आहे. पोलिस निरीक्षक सतीश गवई यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली गणेशाची प्रतिमा चतुर्थीच्या दिवशी विधिवत प्रतिष्ठापित करण्यात आली. अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज आरतीचा मान विविध मान्यवरांना देण्यात येत आहे, ज्यामुळे प्रत्येकाला आपलेपणाची जाणीव होत आहे. या उत्सवात तालुक्यातील राजकीय नेते, व्यापारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, तळा तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच सामान्य नागरिक दर्शनासाठी येत आहेत. येथील आगळा उपक्रम म्हणजे सर्व धर्मातील पाहुण्यांना समान, आदर देण्यात येत आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक एकोपा आणि मैत्रीचे प्रतीक ठरत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून पोलिस आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. पोलिस हे आपले मित्र आहेत, ही संकल्पना अशा उपक्रमांमुळे बळकट होते. सर्वधर्मीय समाजबांधव एकत्र येऊन श्री गणेशाची आरती करतात, यामुळे मैत्री, श्रद्धा आणि सामंजस्याचा सुंदर संगम घडतो आहे. या पद्धतीने पोलिस ठाण्यातील गणपती हा सर्वांचा गणपती बनला आहे, अशी भावना नागरिकांमध्ये उमटत आहे.
..........
रोह्यात मोफत नेत्र व मधुमेह तपासणी
रोहा (बातमीदार) ः सामाजिक बांधिलकी जपत सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट, रोहा आणि लायन्स क्लब रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोफत नेत्रतपासणी, मधुमेह तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. बुधवारी (ता. ३) भाटे सार्वजनिक वाचनालय येथे भरलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नेत्रविकारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. अश्रू ग्रंथी (लासूर) व तिरळेपणा या विकारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियेसोबतच मोतीबिंदूसाठी तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मधुमेह तपासणीही मोफत करण्यात आली. या शिबिरासाठी लायन्स हेल्थ फाउंडेशन, अलिबाग यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लायन्स क्लब अध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर, सुश्मिता शिट्यालकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष अमेय जोशी, लायन्स क्लब सचिव तेजल शहा, मिलन शहा, संपदा देशपांडे, वैकुंठ माने, नुरुद्दीन रोहवाला, बिना दामाने, प्रेषित बारटक्के, चंद्रकांत पार्टे, अकील रोहवाला यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन नेत्रतपासणी, मधुमेह तपासणी तसेच शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन घेतले.
................
जांभुळपाडा बसस्थानकाचे उद्घाटन
अलिबाग (वार्ताहर) ः अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड - हाशिवरेमार्गे रेवस मार्गावर असलेल्या जांभुळपाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या बसस्थानकाचे मंगळवारी (ता. २) औपचारिक उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी त्यांच्या खासगी निधीतून केला असून, प्रवाशांसाठी सोयीसुविधा वाढण्यास मदत होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, नरेंद्र पाटील, विश्वनाथ पाटील, हिनेश पाटील, प्रकाश पाटील, वैभव पाटील, केतन पाटील, दयानंद पाटील, भरत पाटील, सुनील धसाडे, नीलेश पाटील यांसह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या बसस्थानकामुळे प्रवाशांना पावसाळ्यातील अडचणींवर मात करता येणार असून, रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि चित्रलेखा पाटील यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com