कर्जतमध्ये टोरेंटचा जलविद्युत प्रकल्प;

कर्जतमध्ये टोरेंटचा जलविद्युत प्रकल्प;

Published on

कर्जतमध्ये टोरेंटचा जलविद्युत प्रकल्प;
भाजपसह राष्ट्रवादीचा तीव्र विरोध, स्थानिकांमध्ये मतभेद
कर्जत, ता. ४ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर कंपनीचा ३००० मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक कार्यालय रायगड-२ आयोजित जनसुनावणी नुकतीच झाली, मात्र या सुनावणीत स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांचा मोठा विरोध दिसून आला. त्यात भाजपचे नेतेही आघाडीवर होते.
भाजपचे युवा प्रदेश सरचिटणीस ऋषिकेश जोशी आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते किरण ठाकरे यांनी सुनावणीत विरोधाची स्पष्ट भूमिका घेतली. पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार असेल, तर हा प्रकल्प कर्जतमध्ये होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पदाधिकारी सुधाकर घारे, तालुकाध्यक्ष दीपक श्रीखंडे यांनीही प्रकल्पाचा विरोध नोंदवला. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट)चे संकेत भासे यांनी मात्र प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला, ज्यामुळे राजकीय गटबाजी स्पष्टपणे दिसली. या प्रकल्पासाठी एकूण ९३२ एकर जमीन लागणार असून, त्यापैकी ६०० एकर जंगल आहे. विशेष म्हणजे, वन विभागाची इतकी जमीन जाणार असूनही वन अधिकाऱ्यांची सुनावणीत अनुपस्थिती उपस्थितांच्या नाराजीचे कारण ठरली. स्थानिक पत्रकारांनाही सुनावणीबाबत पूर्वसूचना दिली नव्हती, अशी माहिती समोर आली.
...............
स्थानिकांचे मतभेद – विकास विरुद्ध पर्यावरण
सुनावणीत काही ग्रामस्थांनी प्रकल्पाचे स्वागत करताना विकास आणि रोजगाराच्या संधींचा मुद्दा मांडला. त्यांच्या दाव्यानुसार, हा प्रकल्प झाला तर रोजगार उपलब्ध होतील आणि तालुक्याचा चेहरामोहरा बदलेल, तर बहुसंख्य शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी जंगलतोड, वन्यजीवांवर होणारा परिणाम, तसेच योग्य मोबदला न मिळण्याची भीती व्यक्त करत प्रकल्पाला जोरदार विरोध केला.
..............
प्रकल्पाची रूपरेषा आणि पुढील प्रक्रिया
ढाक डोंगर परिसरात उभारला जाणारा हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणार असून, त्यासाठी १३,०१७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्प पालीतर्फे कोथल खलाटी, पोटल, साईडोंगर, अंबोट, ढाक, भालिवडी या गावांमध्ये प्रस्तावित आहे. प्रशासनाने सुनावणीत आलेल्या हरकती आणि पाठिंब्यांचा सविस्तर अहवाल तयार करून पुढील १० दिवसांत पर्यावरण विभागाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
...............
विकास की पर्यावरण?
कर्जतमधील हा प्रकल्प विकास आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो, मात्र स्थानिकांचा विश्वास जिंकणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला देणे, हे प्रशासन आणि कंपनीसमोरील मोठे आव्हान आहे अन्यथा हा प्रकल्प थांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com