सिंगापूर पोर्टमुळे प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांची संधी

सिंगापूर पोर्टमुळे प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांची संधी

Published on

सिंगापूर पोर्टमुळे प्रकल्पग्रस्तांना रोजगार
जेएनपीएतील परदेशी गुंतवणूक असणारा दुसरा टप्पा
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीए) येथील सिंगापूर बंदर प्राधिकरण (पीएसए) मुंबई कंटेनर टर्मिनल (बीएमसीटी) फेज-२ चे हैदराबाद हाऊस, नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. या प्रकल्पाचे २०१८मध्ये पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. आता दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन झाले. या प्रकल्पामुळे पाच हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असून, उरण तालुक्यातील जेएनपीएच्या बहुतांश प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले जाणार असल्याची माहिती उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिली.
जेएनपीएने उपलब्ध केलेल्या जागेवर परदेशी गुंतवणूक असणारा प्रकल्पाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. या प्रकल्पामुळे भारत आणि सिंगापूर यांच्यात व्यापाराला चालना मिळाली आहे. तसेच द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होणार आहे. या टर्मिनलमुळे महाराष्ट्राने भारतातील बंदर क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पीएसए इंटरनॅशनलद्वारे चालवले जाणारे टर्मिनल अक्षय ऊर्जेवर कार्यरत असून, समर्पित फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) अनुरूप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे. या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता ४.८ दशलक्ष टीईयू इतकी झाली आहे. जहाज थांबण्याच्या घाटाची लांबी दोन हजार मीटरपर्यंत वाढली आहे. यात २४ घाट क्रेन आणि ७२ रबर-टायर्ड गॅन्ट्री क्रेन (आरटीजी) यांचा समावेश आहे. या फेज-२ विस्तारामुळे बीएमसीटीची क्षमता २.४ दशलक्ष टीईयूपासून दुप्पट होऊन ४.८ दशलक्ष टीईयू झाली आहे. भारतातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क आहे.
-----------------------------
३० वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम
जेएनपीएत सुमारे १० लाख कंटेनर हाताळण्यात येत आहेत. त्यापैकी पाच लाख कंटेनर सिंगापूर पोर्ट हाताळणार आहे. सिंगापूर देशातील मोठी गुंतवणूक जेएनपीएमध्ये आली आहे. त्यामुळे नोकऱ्यांची निर्मिती करण्यासाठी सिंगापूर पोर्टचा मोठा वाटा आहे. जेएनपीएने प्रकल्पात स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे प्राधान्यक्रम ठरवले आहेत. ३० वर्षांपासून नोकऱ्या नसलेल्या प्रकल्पग्रस्तांचे जेएनपीएने वर्गीकरण केले होते. त्यानुसार स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com