पनवेलमध्ये अट्टल गुन्हेगाराला शिताफीने अटक; ओलीसांची सुटका,

पनवेलमध्ये अट्टल गुन्हेगाराला शिताफीने अटक; ओलीसांची सुटका,
Published on

अट्टल गुन्हेगाराचा पोलिसांवर हल्ला
थरारनाट्यात चार पोलिस जखमी; नातेवाईक ओलीस

पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : पनवेलमधील गोडसे आळीतील मंगला निवास परिसरात मालमत्तेच्या वादातून नातेवाइकांना ओलीस ठेवून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला पनवेल शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. तसेच ओलिसांची सुखरूप सुटका केली आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे प्रयत्न केले, मात्र आरोपीने पोलिसावरच कोयता आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याने यामध्ये चार पोलिस अंमलदार जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ३) घडली
सोबन बाबुलाल महतो (वय ३५) याने बुधवारी (ता. ३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपल्या नातेवाइकांना घरामध्ये कोंडून ठेवून त्यांना कोयता व कुऱ्हाडीच्या धाकाने ओलीस ठेवल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ गोडसे आळीतील मंगला निवास येथे धाव घेतली. या वेळी पोलिसांनी आरोपी सोबन महतो याची माहिती घेतली असता, तो २०१८ मधील खुनाच्या प्रकरणातील आरोपी असल्याचे तसेच तो नुकताच जामिनावर सुटून बाहेर आल्याची माहिती मिळाली. या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा मुंडे यांनी आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र त्याने पोलिसांनाच ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलिस उपनिरीक्षक अस्पतवार यांच्यासह अतिरिक्त पोलिस बळ बोलावण्यात आले. मात्र आरोपी दरवाजा उघडत नसल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये महतो याने पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात पोलिस नाईक रवींद्र पारधी, पोलिस हवालदार माधव शेवाळे, पोलिस शिपाई साईनाथ मोकल व पोलिस नाईक सम्राट डाकी जखमी झाले. या वेळी सम्राट डाकी यांनी स्वतःच्या हातावर कोयत्याचा वार झेलत सहकाऱ्यांचे प्राण वाचवले.

चिली स्प्रेचा वापर
आरोपी महतो याने १६ वर्षीय पुतणीच्या गळ्याला कोयता लावून ओलीस ठेवल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. मात्र पोलिसांनी चिली स्प्रेचा वापर करून प्रसंगावधान दाखवत महतो याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सर्व ओलिसांची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईत जखमी झालेल्या पोलिस अंमलदारांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com