हरित वाढवण महामार्गासाठी निविदा

हरित वाढवण महामार्गासाठी निविदा

Published on

हरित वाढवण महामार्गासाठी निविदा
आठ पदरी मार्गासाठी २,५७५ कोटींचा खर्च
निखिल मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा

पालघर, ता. ४ : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या व जागतिक क्रमवारीत येणाऱ्या हरित वाढवण बंदर प्रकल्पाच्या कामाला गती येत आहे. त्यातच या बंदरासाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या आठ पदरी हरित वाढवण महामार्गाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बुधवारी (ता. ३) निविदा प्रसिद्ध केली आहे. चार ते आठ पदरी असलेल्या या महामार्गासाठी करासह २,५७५ कोटी रुपये अंदाजित खर्च गृहीत धरण्यात आला आहे.

वाढवण बंदराला जोडण्यासाठी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापासून तवा ते वाढवण बंदर असा ‘एनएच २४८ एस’ क्रमांकाचा हा मार्ग असणार आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत आठ पदरी असलेल्या आणि ३२.१०८ किमी लांबीच्या या महामार्गाच्या भूसंपादनासाठी नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली होती. पालघर आणि डहाणू तालुक्यांतील २८ गावांमधील जमीन या महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार डहाणू व पालघर उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून भूसंपादन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. प्रस्तावित वाढवण बंदर जोड महामार्गासह बंदराला दिल्ली-मुंबई समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी बोईसर ते वाणगाव स्थानकांदरम्यान असलेल्या प्रस्तावित नेवाळे स्थानकापासून १२ किमी लांबीचा नवीन रेल्वेमार्गही वाढवणसाठी तयार केला जाणार आहे. या रस्ते आणि रेल्वेमार्गासाठी एकूण ५७१ हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे.
प्रस्तावित महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या परिसरात लॉजिस्टिक पार्क, कार्गो हब, एसईझेड, कंटेनर पार्किंग विकसित करण्याची योजना आहे. भूसंपादन आणि उभारणीसाठी अंदाजे २,८८१ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आदेश दिल्यानंतर हा महामार्ग अडीच वर्षांत पूर्ण करणे अपेक्षित आहे. महामार्गाची देखभाल-दुरुस्ती १० वर्षांच्या उत्तरदायित्वासाठी ठेवण्यात आली आहे. ही निविदा प्राधिकरणाच्या अध्यक्षांकरिता मुख्य व्यवस्थापक रजनीश कपूर यांच्या सहीने बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हे काम अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम अर्थात ईपीसी पद्धतीने केले जाणार आहे.

२८ गावांतील जमीन अधिग्रहित केली जाणार
डहाणू तालुक्यातील वरोर, वासगाव, चिंचणी, तणाशी, बावडा, कोलवली, वाणगाव, साये, उर्से, पेठ, धामटणे, कोल्हाण, घोळ, तवा तसेच पालघर तालुक्यातील नेवाळे, राणीशिगाव, हनुमाननगर, शिगाव, सुमडी, खुताड, बोईसर, गारगाव, रावते, चिंचारे, आकेगव्हाण, आकोली, नानिवली, आंबेदे या गावांतील जमीन महामार्गासाठी अधिग्रहित केली जाणार आहे. मुंबई दिल्ली एक्स्प्रेसवेच्या चिंचारे गावाजवळ आंतरबदल मार्ग (इंटरचेंज) असणार आहे. या महामार्गासाठी सूर्या नदीवर मोठा पूल बांधण्यात येणार आहे. डहाणू व पालघर तालुक्यातील प्रत्येकी १४ गावांतून तो जाणार आहे.


स्थानिकांसाठी दोन स्वतंत्र सेवामार्ग
प्रादेशिक विकास आणि दळणवळणासाठी उभारण्यात येणाऱ्या हरित वाढवण महामार्गाला जोडून दोन नवीन स्वतंत्र सेवामार्ग बनविले जाणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना या मार्गावरून प्रवास करणे सुलभ होणार आहे. हरित वाढवण बंदराच्या संचालक मंडळामध्ये या सेवा मार्गिकेच्या उभारणीची घोषणा केली गेली आहे. वाढवण महामार्गावर सततची होणारी अवजड वाहतूक लक्षात घेता दोन स्वतंत्र सेवा रस्त्यांचा प्रस्ताव बंदराच्या संचालक मंडळासमोर मांडला गेला. त्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com