कल्याण अवती-भवती
कल्याण पंचायत समितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
टिटवाळा (वार्ताहर) : कल्याण पंचायत समितीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’अंतर्गत कार्यशाळा नुकतीच उत्साहात पार पडली. या अभियानाचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींचे सर्वांगीण सशक्तीकरण असून, त्याद्वारे लोकचळवळ निर्माण करणे हाच मुख्य हेतू आहे. कार्यशाळेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गटविकास अधिकारी संजय भोये यांनी माहिती दिली, की तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे. स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावर १५, १२ व आठ लाख, जिल्हास्तरावर ५० लाख, विभागीय स्तरावर एक कोटी, तर राज्यस्तरावर पाच कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. सुशासनयुक्त, जलसमृद्ध व स्वच्छ गाव, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग, महिला सक्षमीकरण, नावीन्यपूर्ण उपक्रम यावर मार्गदर्शन करण्यात आले. पराग भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. व्यासपीठावर गटविकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक बीडीओ रघुनाथ गवारी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल धांडे, विस्तार अधिकारी प्रशांत गजाकोश, कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
.......................
केडीएमसीविराेधात बसपाचे धरणे आंदोलन
कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा न मिळाल्याने बहुजन समाज पक्षाने (बसपा) पालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही उपाययोजना न केल्याने बसपाचे नेते सुदाम गंगावणे, मधुकर बनसोड, बाळू भोसले, प्रदीप सोनावणे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आयुक्त अभिनव गोयल यांनी याप्रकरणी अजूनही ठोस पावले उचलली नसल्याने बसपाच्या कार्यकर्त्यांनी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत दररोज आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करीत बसपाने सामाजिक न्यायाच्या लढ्याला गती दिली आहे. या धरणे आंदोलनात बसपाचे सुदाम गंगावणे, मधुकर बनसोड, बाळू भोसले, प्रदीप सोनावणे, दीपक खंदारे, आल्मेश मिठबावकर, विजय सोनावणे आदींनी सहभाग घेतला.
.........................
क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : महान क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त कल्याण महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या हस्ते हा अभिवादन सोहळा पार पडला. या वेळी सहाय्यक जनसंपर्क अधिकारी सुमीत बोयत आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या त्याग व योगदानाची आठवण केली. उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे आणि नवीन पिढीला प्रेरणा देणे, हेच या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. महापालिकेच्या वतीने अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.
...................
कल्याणमध्ये श्री संत राममारुती महाराज यांच्या १०७व्या पुण्यतिथी उत्सव
कल्याण (वार्ताहर) : कल्याणमधील श्री संत राममारुती महाराज यांचा १०७वा पुण्यतिथी उत्सव ८ ते १५ सप्टेंबरदरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री राममारुती मंदिरात दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अखंड नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, भजन, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप, लघुरुद्राभिषेक, सामुदायिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, श्री दुर्गा सप्तशती, भक्तिनाट्य, गोंधळ, जोगवा, आर्ट ऑफ लिव्हिंग, व्याख्याने व संगीत सेवा यांचा समावेश आहे. सोमवारी (ता. १५) श्रींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, महाप्रसादाचे आयोजनही केले आहे. संस्थानचे अध्यक्ष शिरीष अनंत गडकरी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उत्सवकाळात दररोज भजन, वारकरी कीर्तन, हरिपाठ होणार आहे.
...................
डॉ. संदीश जयभाये यांना जेएमएफ शिक्षाविद पुरस्कार
कल्याण (वार्ताहर) : बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीश जयभाये यांना त्यांच्या शैक्षणिक व वैज्ञानिक योगदानाबद्दल जेएमएफ शिक्षाविद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जह्नवीस मल्टिफाउंडेशन व वंदे मातरम् कॉलेज, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. एस. सत्यकुमार (अध्यक्ष, हेवी वॉटर बोर्ड, अणुऊर्जा विभाग) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मश्री गजानन माने यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व लाभले. डॉ. जयभाये यांनी विद्यार्थ्यांवर आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणारे संशोधन व कार्य केल्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. हा कार्यक्रम शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.