फायटर क्लबसाठी तलाठी कार्यालय फोडले

फायटर क्लबसाठी तलाठी कार्यालय फोडले

Published on

फायटर क्लबसाठी तलाठी कार्यालय फोडले
तपासात धक्कादायक खुलासा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : शहरातील महात्मा फुले रोड परिसरात असलेल्या पु. भा. भावे सभागृहातील तलाठी कार्यालयात अजब प्रकार घडला. सुट्टीच्या दिवशी (शनिवारी-रविवारी) बंद असलेल्या या कार्यालयाचे कुलूप कोणीतरी तोडून नव्याने कुलूप लावले. मागील सोमवारी (ता. १) कार्यालय उघडताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. सुरुवातीला यामागे कागदपत्रे चोरीचा संशय व्यक्त केला गेला, परंतु पोलिस तपासात एक वेगळाच आणि धक्कादायक खुलासा समोर आला.

विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कार्यालयाच्या कुलूप बदलण्याच्या घटनेमागे कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी परिसरातील चावीवाल्यांची चौकशी सुरू करण्यात आली. याचदरम्यान एका चावीवाल्याच्या भावाने सांगितले की, एक तरुण त्याला कार्यालयात घेऊन गेला होता व कुलूप उघडण्यास सांगितले होते. त्याने स्वत:ला मंत्रालयात काम करणारा अधिकारी सांगितले आणि सरकारी ओळखपत्र दाखवले. त्यासाठी ३८० रुपये ऑनलाइन दिल्याचेही तो म्हणाला. या व्यवहाराचा तपशील मिळवून पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेतला. त्याचे नाव विक्रम प्रधान असून, तो मुंबई मंत्रालयातील वित्त विभागात कंत्राटी शिपाई म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असता त्याने दिलेली माहिती धक्कादायक ठरली.

विक्रमने सांगितले की, देशप्रेमापोटी तो ‘फायटर’ तयार करू इच्छित होता. देशासाठी लढणारे युवक तयार करण्याच्या उद्देशाने ‘ग्राउंड फायटर क्लब’ सुरू करण्याचा त्याचा विचार होता. त्यासाठी योग्य जागेचा शोध घेत असताना तलाठी कार्यालयाची जागा त्याला योग्य वाटली. त्यामुळे त्याने ते कुलूप तोडून नवीन कुलूप बसवले आणि त्या जागेचा ताबा घेतला. विक्रम प्रधान याने ही कृती पूर्णतः स्वतःच्या मनाने केली असून, कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कार्यालय फोडल्याची कबुली दिली आहे.

आधारवाडी कारागृहात रवानगी
त्याच्यावर सरकारी मालमत्तेची तोडफोड व अनधिकृत प्रवेश यांसारखे गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी त्याला अटक करून कल्याण सत्र न्यायालयात हजर केले. सुरुवातीला त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपल्यावर गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली. या प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून, सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विक्रम प्रधान याचा हेतू काहीही असला तरी सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण व बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com