टिटवाळ्यात अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप
टिटवाळ्यात अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी टिटवाळा शहरासह परिसरात गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात भक्तांनी गणरायाला मोठ्या उत्साहाने आणि भावनिकतेने निरोप दिला. १० दिवस घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये साजरा झालेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीला सांगता झाली. दुपारपासूनच टिटवाळ्याच्या रस्त्यांवर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
नागरिकांनी आपल्या लाडक्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने, ढोल-ताशांच्या गजरात, भजनी मंडळांच्या तालावर, गुलालाच्या रंगात आणि लेझीमच्या ठेक्यांनी निरोप दिला. अनेकांनी पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवून घरगुती गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले, तर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचेही शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आले. पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग या सोहळ्यात दिसून आला.
टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नोंद असलेल्या ५० सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विविध ठिकाणी विसर्जन करण्यात आले. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुकाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होत्या. विविध रंगरंगोटी आणि सामाजिक संदेश देत मंडळांनी यंदाही आपली परंपरा साजरी केली. महिलांचा सहभाग लक्षणीय होता, तर तरुणाईने ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाला ऊर्जा दिली. संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तगडा बंदोबस्त केला होता. वाहतुकीचे नियोजन सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. आपत्कालीन सेवेच्या दृष्टीने अग्निशमन दलाकडून प्रत्येक विसर्जनस्थळी दोन सुरक्षा व बचाव कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
१० दिवस गणरायाच्या आगमनाने घराघरांत भरलेला आनंद, आज निरोपाच्या वेळी भावुकतेत बदलला. डोळ्यांत अश्रू घेऊन आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या हाकेसह टिटवाळ्यातील भक्तांनी गणरायाला निरोप दिला.