विकसकांकडून धार्मिक वाद
विकसकांकडून धार्मिक वाद
मंत्री प्रताप सरनाईक यांचे कारवाईचे आदेश
भाईंदर, ता. ७ (बातमीदार) : बांधकाम प्रकल्पांमध्ये विशिष्ट धर्माच्या ग्राहकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने जाहिरात करणारे दोन विकसक अडचणीत आले आहेत. या प्रकरणात थेट परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मिरा-भाईंदर महापालिकेने या दोन्ही विकसकांना नोटिसा बजावल्या आहेत.
काशीमिरामधील विनयनगर भागात एक बहुमजली इमारतीचा प्रकल्प सुरू आहे. या इमारतीमध्ये घरे घेण्यासाठी विकसकांकडून विशिष्ट धर्माच्या लोकांना आवाहन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यासाठी जाहिरातीत इमारतीमध्ये धार्मिक कार्यासाठी स्वतंत्र जागा ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या जाहिरातीचे फलक लागल्यानंतर शिवसेनेकडून त्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला. कोणताही बांधकाम प्रकल्प सर्वधर्मीयांसाठी खुला असणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या जाहिराती देऊन विकसकाकडून धार्मिक वाद निर्माण केला जात आहे. त्यामुळे विकसकाने जाहिराती हटवून माफी मागावी तसेच पोलिसांनी विकसकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. अशाच पद्धतीने भाईदर पश्चिमेकडेही एका विकसकाने एका विशिष्ट धर्मीयांना आकर्षित करण्यासाठी आपल्या बांधकाम प्रकल्पाची जाहिरात केली. या दोन्ही घटनांची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. व्यवसाय वृद्धीच्या स्पर्धेत समाजातील मूलभूत मूल्ये पायदळी तुडवत धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व धर्मांध स्वरूपाच्या जाहिरातींमार्फत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रकार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करून त्यांचे बांधकाम परवाने रद्द करावे, असे निर्देश प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेकडून विकसकांना नोटिसा
मिरा-भाईंदर महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक पुरुषोत्तम शिंदे यांनी दोन्ही प्रकल्पांच्या विकसक व वास्तुविशारदांना नोटिसा बजावल्या आहेत. विशिष्ट समाजाच्या नागरिकांना सदनिका विक्री करण्यासाठी करण्यात आलेल्या जाहिराती भारतीय संविधानाचे कलम १४ व १५चे उल्लंघन तसेच मूलभूत हक्काचे उल्लंघन व धार्मिक तेढ निर्माण करणारे आहे. या जाहिराती तत्काळ थांबवाव्यात तसेच याप्रकरणी तातडीने महापालिकेकडे खुलासा सादर करावा अन्यथा महापालिकेकडून दिलेली बांधकाम परवानगी थांबविण्यात येईल, असा इशारा नोटिसांद्वारे देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.