नवी मुंबईत आनंदाश्रूंनी गणरायाचे विसर्जन

नवी मुंबईत आनंदाश्रूंनी गणरायाचे विसर्जन

Published on

वाशी, ता. ७ (बातमीदार) : लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीदिनी नवी मुंबईत भावपूर्ण उत्साहात निरोप दिला. १० दिवसांचा पाहुणचार घेऊन शनिवारी (ता. ६) गणराय आपल्या घरी गेले. त्यांना निरोप देण्यासाठी पावसानेदेखील उपस्थिती लावली होती. या पावसाने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित झाला. ढोल-ताशांच्या निनादात गणेशभक्तांनी बेधुंद होऊन नाचत विर्सजन मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात विर्सजन करून निरोप दिला.

नवी मुंबई महापालिकेच्या १६५ विसर्जनस्थळी केलेल्या व्यवस्थेमध्ये अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा गणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने पार पडला. २२ नैसर्गिक व १४३ कृत्रिम विसर्जनस्थळी यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या सांगता दिवशी ९,९२९ घरगुती व ७४९ सार्वजनिक अशाप्रकारे एकूण १०,६७८ मूर्तींचे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या अशा गजरात भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बनविण्यात आलेल्या व्यासपीठावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणाऱ्या मूर्तींवर पुष्पवृष्टी करीत श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप दिला, तसेच श्रीगणेशभक्तांचे स्वागत केले. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विसर्जन सोहळ्याचे नवी मुंबई महापालिकेच्या समाजमाध्यमांच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी हा सोहळा ऑनलाइन अनुभवला.

आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर असूनही नागरिक मोठ्या उत्साहाने या विसर्जन सोहळ्यात सहभाग झाले होते. रविवारी (ता. ७) पहाटे साडेपाचपर्यंत चाललेल्या या विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची यंत्रणा अथक कार्यरत होती. सर्वच विसर्जन स्थळांवर चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोपरखैरणे धारण तलावावरील यांत्रिकी तराफा, फोर्कलिफ्ट व क्रेन सुविधेची पाहणी केली, तसेच इतर विविध ठिकाणच्या विसर्जनस्थळांना भेटी देत व्यवस्थेची पाहणी केली होती.

नवी मुंबईकरांनी जपला पर्यावरणपूरक दृष्टिकोन
सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, या आवाहनाला अनुसरून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावात विसर्जन करीत पर्यावरणशील दृष्टिकोन जपला. प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सव, शाडू मातीच्या मूर्तींच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अशा भक्तांना आकर्षक कागदी पिशवीसह आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पर्यावरणमित्र असे प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.

आठ विभाग कार्यालय क्षेत्रात १४३ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनाला पसंती दर्शविली. नागरिकांच्या उत्तम सहकार्यामुळे यावर्षीचा श्रीगणेशोत्सव पर्यावरणशील पद्धतीने उत्तमरित्या निर्विघ्नपणे पार पडला.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com