नवी मुंबईकर वर्षभर पाण्यापासून चिंतेमुक्त
वाशी, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. याठिकाणी महापालिकेच्या वतीने उद्या सोमवारी (ता. ८) जलपूजन करण्यात येणार आहे. यंदा मोरबे धरण क्षेत्रात तीन हजार ४०९ मिमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची वर्षभर पाण्याची चिंता मिटली आहे.
यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने ऑगस्टच्या मध्यांतरामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे प्रतिदिन ४५० दशलक्ष क्षमतेचे मोरबे धरण पूर्ण भरले आहे. ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केलेली आहे. सोमवारी दुपारी मोरबे धरणाचे जलपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात समाधानकारक पावसाची नोंद झाली असून मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृद्ध झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या असणाऱ्या मोरबे धरणात ऑगस्टच्या सुरुवातीला धरण ८० टक्के भरले होते. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली होती; पण ऑगस्टच्या मध्यांतरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली व २० ऑगस्ट रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रतिदिन ४५० एमएलडी पाणी वापरले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील सात गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटरला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो.
यापूर्वीचा धरणसाठा
२०१८ मध्ये २५ जुलै रोजी, तर २०१९ मध्ये ४ ऑगस्ट रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. २०२० मध्ये पाऊस लांबल्याने ९५ टक्के धरण भरले होते. २०२१ मध्येदेखील सप्टेंबरच्या अखेरीस धरण भरले होते. २०२२ मध्ये धरण काठोकाठ भरले होते. २०२३ मध्येदेखील सप्टेंबरच्या अखेरीस धरण भरले होते. २०२४ मध्ये ऑगस्टच्या अखेरीस धरण भरले होते; पण यंदा २०२५ मध्ये ऑगस्टच्या मध्यांतरामध्ये हे धरण भरले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.