‘ओळखी’वर शिक्कामोर्तब!
वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये बाधित झालेल्या गावांची ओळख कायम राहणार आहे. पुनर्वसनाच्या ठिकाणी बाधित गावांचीच नावे देण्यात येणार आहेत. यासाठी प्रकल्प व पुनर्वसनबाधित दहा गाव समन्वय समितीने पाठपुरावा केला होता. त्यांनी सिडकोकडे केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा गावांमधील जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे संबंधित गावातील शेती, घर, मंदिर, तलाव आणि इतर सर्व गोष्टी सोडून द्यावे लागले आणि त्यांच्या त्यागामुळे नवी मुंबई विमानतळ उभे राहिले. प्रकल्पबाधित गावांचे करंजाडे, वडघर, त्याचबरोबर महात्मा फुले महाविद्यालयाच्या बाजूला पुनर्वसन करण्यात आले. त्यांना त्या ठिकाणी घरांच्या बदल्यात विकसित भूखंड देण्यात आले. त्यामुळे आता पुनर्वसित भागाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्या ठिकाणी रस्ते, पाणीपुरवठ्यासह अन्य सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मंदिरही बांधण्यात आले आहे. याव्यतिरिक्त संयुक्तरीत्या शाळेची इमारतसुद्धा उभारण्यात आली आहे. असे असले तरी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या विमानतळ प्रकल्पबाधितांची ओळख पुसली जाते की काय, अशी स्थिती होती.
ज्या गावांमध्ये अनेक पिढ्या घडल्या, त्याचबरोबर या भागाशी नाव जोडले गेले, तेच संपणार असल्याने एकंदरीत स्थिती होती. चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोंबडभुजे, तरघर, गणेशपुरी आणि उलवे ही गावे विस्थापित झाली; पण त्यांची खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-१, आर-२, आर-३, आर-४, आर-५ अशी नवीन नावे दिली. गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकण्यात आली होती. या विस्थापित गावांना त्यांच्या जुन्या नावांचीच ओळख परत द्यावी, अशी मागणी होती. ही नावेच आमची परंपरा, वारसा आणि अस्मिता जपतात, अशी भूमिका दहा गाव समन्वय समितीने मांडली होती. यासंदर्भात आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात बैठकाही पार पडल्या. अखेर सिडकोने बाधितांची ही मागणी मान्य केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये झालेल्या गावांचे पुनर्वसन झालेल्या ठिकाणी ओळख पुसली गेली होती; परंतु ज्यांच्या त्यागावर जागतिक प्रकल्प उभा राहिला, अशा दहा गावांची ओळख कायम राहावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीला दोन्ही आमदारांचे बळ मिळाले. शेवटी सिडकोला मागणी मान्य करावी लागली.
- समीर केणी, वडघर विभागीय अध्यक्ष, भाजप
अशी असणार नवीन नावे
प्रस्तावित नावे सुधारित मूळ गावांची नावे
सेक्टर-२५ तरघर व कोंबडभुजे सेक्टर-२५
सेक्टर-२५ ए कोंबडभुजे व गणेशपुरी सेक्टर-२५ ए
सेक्टर-२९ सेक्टर-२९ (नावात बदल नाही)
सेक्टर-२६ वाघिवली सेक्टर-२६
सेक्टर-१३ डुंगी सेक्टर-१३
सेक्टर आर-१ चिंचपाडा सेक्टर-आर १
सेक्टर आर-२ चिंचपाडा सेक्टर-आर २
सेक्टर आर-३ चिंचपाडा व कोल्ही सेक्टर-आर ३
सेक्टर आर-४ कोपर सेक्टर-आर ४
सेक्टर आर-५ वाघिवलीवाडा सेक्टर-आर ५
सेक्टर-१ वरचे ओवळे सेक्टर-१
सेक्टर-२४ उलवे सेक्टर-२४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.