थोडक्‍यात नवी मुंबई

थोडक्‍यात नवी मुंबई

Published on

गटारांवरील झाकणांची दुरवस्था; अपघाताचा धोका वाढला
स्थानिकांची पालिकेकडे झाकणे बदलण्याची मागणी तीव्र
नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर २० येथील स्मशानभूमी परिसरातील पदपथांवरील गटाराच्या झाकणांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: या परिसरात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि चाकरमानी यांची नेहमीच वर्दळ असल्याने अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
स्मशानभूमी, बँका, शिकवणी वर्ग तसेच फळभाज्यांचे मार्केट यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो; मात्र गटारांवरील झाकणांचा काही भाग तुटल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक झाकणांमध्ये मोठमोठी छिद्रे निर्माण झाली आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या नागरिकांना सतत अपघाताची भीती वाटते. ज्येष्ठ नागरिकांना चालताना पाय अडकून पडण्याचा धोका तरुणाईलाही सतावतो आहे. सध्या या झाकणांवर तात्पुरते लाकडी प्लायचे तुकडे ठेवण्यात आले आहेत; मात्र हे उपाय अपुरे आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेने या ठिकाणी पदपथांचे काम पूर्ण केले असले तरी गटारावरील झाकणांची अदलाबदल न केल्यामुळे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप झाकणांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. या झाकणांवर पाय ठेवताना झाकण गटारात जाते की काय, अशी भीती सतत वाटते. विशेषत: सकाळी कामावर जाण्याच्या घाईत चालताना धोका अधिक वाढतो, असे एका व्यक्तीने सांगितले. दररोज विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा ज्येष्ठ नागरिकांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी पालिकेकडे तातडीने नवीन झाकणे बसवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सामाजिक संघटनाही पुढे सरसावल्या आहेत.
....................
तुर्भे गावातील माजी सरपंच दशरथ दत्तू घरत यांचे निधन
तुर्भे (बातमीदार) : तुर्भे गावाचे माजी सरपंच व ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे संचालक दशरथ दत्तू घरत (डीडी) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर गावामध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूवेळी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे. दशरथ घरत यांनी तुर्भे गावात दीर्घकाळ सरपंच म्हणून काम केले. त्यांनी गावाच्या पिण्याच्या पाण्यापासून ते शाळा, गावठाण योजना आणि सामाजिक कामात विशेष योगदान दिले. त्यांच्या काळात मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भव्य इमारत उभारण्यात आली. गावाच्या विस्तारित भागात प्लॉट वितरणाच्या माध्यमातून नागरिकांना घर मिळवून देण्याची प्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. एमआयडीसीच्या माध्यमातून पिण्याचे पाणी गावात उपलब्ध करून देण्याचे श्रेयही त्यांना आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदानही स्मरणीय आहे. त्यांनी ठाणे तालुका पंचायत समिती सदस्य म्हणून कार्य केले, तसेच नव्या मुंबईतील दगड खाणमालक संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. पुणे येथील टाटा इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीत सिव्हिल इंजिनिअर म्हणून त्यांनी दहा वर्षे काम केले. तुर्भे स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले. राजकीय, बँकिंग क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या शोकसभेचे आयोजन रविवारी (ता. १४) सायंकाळी चार वाजता शांता महिला मंडळ सभागृह तुर्भे येथे करण्यात आले आहे.
.....................
सीवूड्स येथे स्लॅब कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ४६, गुरुदत्त सोसायटीमध्ये रहिवासी पटेल फकीर शहा यांच्या बेडरूममध्ये स्लॅबचे प्लास्टर अचानक कोसळले. या घटनेत त्यांचा मुलगा जखमी झाला असून हात व कंबरेला गंभीर जखमा झाल्या आहेत. शहा हे दुपारी झोपेत असताना हा अपघात घडला. स्लॅबचे प्लास्टर कोसळल्यामुळे संपूर्ण बेडरूम मातीने भरून गेले होते. या घटनेनंतर शेजारील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. भाजपचे आदित्य जाधव यांनी तातडीने भेट घेऊन पाहणी केली आणि सिडको व पालिकेने इमारतीची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. या घटनेमुळे सीवूड्स विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इमारतीतील स्लॅब व प्लास्टरच्या सुरक्षिततेवर त्वरित कारवाई करणे आवश्यक असल्याचे स्‍थानिकांनी सांगितले.
................
बेलापूर येथील वेताळेश्वर मंदिरास नवा साज
नेरूळ (बातमीदार) : बेलापूरच्या कोळीवाड्यातील वेताळेश्वर मंदिरास नवा साज देण्यासाठी नव्याने वास्तू उभारण्याचे काम सुरू झाले आहे. याचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक कृष्ण कोळी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ५) पार पडले. समाजातील विविध घटकांसह आमदार मंदा म्‍हात्रे यांनीदेखील या कार्यक्रमात सहभाग घेतला. मंदिराच्या उभारणीमुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवन अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला गेला. गावातील मच्छीमार संघटना, क्रिकेट संघ व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
...................
चमत्कारामागच्या हातचलाखीचे प्रयोग
नेरूळ (बातमीदार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नवी मुंबई जिल्हा रबाळे व बेलापूर शाखेच्या वतीने रिजन्सी सोसायटी कोपरखैरणे येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने चमत्कारामागील विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण झाले. सेक्रेटरी भूषण चिंचोळे यांनी स्वागत केले, तर जिल्हा प्रधान सचिव प्रा. अमोल कुमार वाघमारे यांनी पंचसूत्री कार्याची माहिती दिली. उपस्थित ६५ नागरिकांनी लहान मुलांसह प्रयोग पाहिले. पाण्याने दिवा पेटवणे, नारळातून भूत भानामती करणे, अशा प्रयोगांनी प्रेक्षक प्रभावित झाले. ज्येष्ठ नागरिक व महिलांनी या सत्राचे कौतुक करीत नियमित आयोजनाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
..................
वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त
नेरूळ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांकडे निवेदन दिले आहे. गेल्या काही दिवसांत दुचाकीवरून मंगळसूत्र चोरीला जाणे, शटर फोडण्याची घटना, परिसरात नशाबाजांचे व भुरट्या चोरांचा उपद्रव यासह विविध गुन्हे वाढले आहेत. निवेदनात पोलिसांनी गस्त वाढवावी, तसेच चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
................
खारघरमध्ये सामुदायिक श्राद्ध प्रयोग
खारघर (बातमीदार) : मनःशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने खारघरमध्ये पितृपक्ष काळात समुदायिक श्राद्ध प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. या शिबिरात मृतात्म्याची सद्गती, मनःशांती, अपत्य कल्याण यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. सत्र सकाळी नऊ ते ११ वाजता आयोजित केले असून, सहभागी होण्यासाठी खारघर सेक्टर पाच कार्यालयात नावनोंदणी आवश्यक आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिकांना धर्म, संस्कृती आणि समाजकल्याणाबद्दल मार्गदर्शन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com