फरार आरोपीचा गल्लीबोळातून थरारक पाठलाग
नवनीत बऱ्हाटे, उल्हासनगर
उल्हासनगरच्या न्यायालयातून कल्याणच्या आधारवाडी कारागृहात नेत असताना एका आरोपीने अचानक पोलिस व्हॅनमधून उडी मारली आणि क्षणात संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली. मध्यरात्री सुरू झालेल्या शोधमोहिमेत गल्लीबोळातून फिल्मी स्टाईलने चाललेला पोलिस-गुन्हेगाराचा श्वास रोखणारा ‘पाठलाग’, भीमकॉलनीच्या अंधारात जीवघेणी लपाछपी, त्यानंतर अखेर विठ्ठलवाडी पोलिसांच्या शिताफी व धाडसाने अवघ्या १२ तासांत आरोपी जेरबंद करण्यात आला. एका कैद्याच्या पलायनाने निर्माण झालेला तणाव, नागरिकांमध्ये पसरलेली भीती आणि पोलिसांच्या चपळाईने घडलेली ही थरारक कारवाई म्हणजेच एखादा ॲक्शन पट म्हणावा लागेल.
-------------------------
संजू वाघरी (वय २०, रा. उल्हासनगर) याला उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. सुनावणीनंतर त्याला कल्याणच्या आधारवाडी कारागृहात नेण्यासाठी पोलिस व्हॅन तयार होती. तो गंभीर गुन्ह्यात अटकेत होता. कारागृहात नेण्यासाठी व्हॅन खडकपाडा परिसरातून विक्कीनगरकडे जात होती. गतिरोधकावर वाहनाचा वेग झाला आणि संजूने क्षणभरात संधी ओळखली. व्हॅनमधून थेट उडी मारून पळ काढला. आरोपी गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात अटकेत असल्याने त्याच्या पलायनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिक घाबरल्याने पोलिस शोधमोहीमेत उतरले.
पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहिमेला सुरुवात झाली. विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पडवळ यांनी त्यांच्या पथकाला तत्काळ सूचना देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले. संशयित ठिकाणी गस्त घालणे आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्यास सांगितले. परिसरात गुप्तहेर तैनात करण्यात आले आणि संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात आले.
अशा वेळी मध्यरात्रीच्या सुमारास संजूने भीमकॉलनी परिसरात फिरताना एका सुरक्षारक्षकाला धमकावून मोबाईल हिसकावून गेल्याची माहिती मिळाली. ही बातमी मिळताच विठ्ठलवाडी गुन्हे शोध पथकाने परिसराला वेढा घातला. त्यानंतर सुरू झाला थरार... अरुंद गल्ल्यांतून वेगवान धावपळ, अंधाऱ्या शेडमागे लपण्याचे प्रयत्न आणि पोलिसांनी जिवाची बाजी लावून केलेला पाठलाग थरारक असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. गुन्हे शोध पथकाचे रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, गणेश राठोड, गणेश डमाळे आणि चंद्रकांत गायकवाड या पोलिसांनी हार न मानता आरोपीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. गल्लीबोळातून पळत पळत संजूने अनेक वेळा पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला; पण पोलिस पथकाने पाठलाग करत त्याला अखेर जेरबंद केले. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला पुढील कारवाईसाठी खडकपाडा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीच्या पलायनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले होते. पण अवघ्या १२ तासांत विठ्ठलवाडी पोलिसांनी दाखवलेली शिताफी, धाडस कौतुकास्पद ठरली.
चौकशी सुरू
अटक केलेल्या आरोपीकडून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्याने पलायनानंतर कोणाला संपर्क केला, कोणत्या ठिकाणी लपून बसला आणि मोबाईल हिसकावण्यामागचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.