पान ६
गोपालक संतोष पाटील गौरक्षा रत्न पुरस्कार
वज्रेश्वरी (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील दिघाशी येथील गोपालक संतोष पाटील यांना गोमातांची रक्षा आणि या क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना जगतगुरू शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते गौरक्षा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संतोष पाटील दहा वर्षांपासून गोसेवा करत आहेत. भिवंडी-वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी स्वखर्चाने शिबिरे घेऊन जीवनात गोमातेच महत्त्व किती हे पटवून देत आहेत. त्याचप्रमाणे गोमय, गोमूत्र, दूध, दही, तूप यापासून विविध प्रकारचे औषधे बनवत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मुंबई येथील एका गोयज्ञ सोहळ्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गोसेविका डॉ. वैदही तामनजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. या वेळी महाराष्ट्रातील विविध भागांतील गोसेवकांचाही सन्मान करण्यात आला.
धसईत महाआरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
टोकावडे (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील धसई येथे प्रकाश पवार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या उपक्रमासाठी कपिल पाटील फाउंडेशन, आय केअर बदलापूर, नेरळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड क्रिटिकल केअर सेंटर तसेच शमन कॅन्सर सेंटर गोवेली यांनी सहकार्य केले.
धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या शिबिरात सुमारे ५५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शुगर, रक्तदाब, ईसीजी, नेत्र तपासणीबरोबरच कॅन्सर सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तज्ज्ञांनी वेळेवर तपासणीचे महत्त्व आणि रोगनिवारणासाठी आवश्यक उपायांची माहिती दिली. याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाष घरत, सामाजिक कार्यकर्ते विजय सुरोशे, प्रवीण पवार, आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. आलेल्या सर्व रुग्णांना मोफत तपासणी व सल्ला मिळाला.
शहा विद्यालयात शिक्षक दिन साजरा
किन्हवली (बातमीदार) : विद्या प्रसारक मंडळ संचलित शहा चंदूलाल सरूपचंद विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत अध्यापनाचे कौशल्य सादर केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक गोपाळ वेखंडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अध्यापन करत शिक्षक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.
घरगुती गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक
१० वर्षीय मुलगा जखमी
भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : शहरातील कल्याण रोडवरील लकडा मार्केट परिसरातील शिमनानी मशिद भागात पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. गौरी गणपती विसर्जनावेळी झालेल्या दगडफेकीची घटना ताजी असतानाच अनंत चतुर्दशीदिनी घरगुती विसर्जन मिरवणुकीवर अज्ञात व्यक्तींनी लाकडी काठी व दगड फेकल्याने १० वर्षीय मुलगा जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीबस्ती गणेश मंदिर परिसरातील विशाल अशोक सिन्हा यांच्या घरगुती गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री साडेनऊच्या सुमारास शिमनानी मशिद परिसरात पोहोचली. त्यावेळी अज्ञात व्यक्तींकडून दगड व काठी फेकण्यात आली. यात पाहुणे म्हणून आलेली संध्या सिन्हा (रा. बदलापूर पूर्व) यांच्या मुलाच्या डोळ्याच्या बाजूला मार लागून तो जखमी झाला. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. संतप्त गणेशभक्तांनी जोरदार घोषणाबाजी करत विसर्जन थांबवण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. त्यांनी हल्लेखोराचा तपास करून कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी शांतता राखत विसर्जन पूर्ण केले. दरम्यान, मुलाची आई संध्या यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला आहे. शहरातील सर्व विसर्जन मार्गांवर पोलिसांनी दुकाने बंद ठेवून बंदोबस्त केला होता.
चोरीप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा
भिवंडी (वार्ताहर) : तालुक्यातील एका मोकळ्या मैदानातून सेंट्रींग प्लेट चोरीप्रकरणी दोन महिलांविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामतघर येथील बलभीम कुलकर्णी यांचा बांधकाम व्यवसाय आहे. काल्हेर येथील कार्तिक एन. क्यू. या साईटवर उघड्यावर सेंट्रींग प्लेट ठेवण्यात आल्या होत्या. ७ सप्टेंबरच्या पहाटे ४३ हजार ३५० रुपये किमतीच्या प्रत्येकी १७ किलो वजनाच्या तीन सेंट्रींग प्लेट चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बलभीम कुलकर्णी यांनी गुंदवली गोसावी तांडा येथील निर्जला अजय गोसावी (वय २०) आणि सोनम (पूर्ण नाव अद्याप समजू शकलेले नाही) या दोघींविरोधात तक्रार दिली असून, नारपोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
शुल्लक कारणावरून मुलीला मारहाण
भिवंडी (वार्ताहर) : शहरातील शानदार मार्केट येथील सार्वजनिक शौचालयाजवळ शुल्लक कारणावरून एका १४ वर्षीय मुलीला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानदार मार्केटमधील इमारत क्रमांक ८च्या शेजारील सार्वजनिक शौचालयाबाहेर सुलतान मोहम्मद अस्लम अन्सारी यांच्या बहिणीने पाण्याने भरलेली बादली ठेवली होती. या वेळी त्याच इमारतीत राहणाऱ्या रियाज अहमद राहील याने त्या बादलीला लाथ मारली. त्याबाबत पीडितेने जाब विचारल्यावर त्याने तिच्याशी धक्काबुक्की केली. तसेच डाव्या हाताच्या अंगठ्यावर व उजव्या पायाच्या गुडघ्यावर दाताने चावा घेत गंभीर दुखापत केली. याप्रकरणी पीडितेचा भाऊ सुलतान यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी रियाजविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.