उत्सवात बिघडले आरोग्य

उत्सवात बिघडले आरोग्य

Published on

ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : बदलते हवामान, वाढते धुळीचे प्रमाण आणि गणपती उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात तेलकट आणि बाजारातील गोड पदार्थांच्या सेवनाने खोकला, व्हायरल ताप आणि घसा खवखवण्याचे त्रास वाढू लागले आहेत. या दिवसात बाह्य रुग्णांमध्ये सुमारे ४० टक्के रुग्णांची वाढ झाली आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तीन-चार दिवसांपासून सतत असा त्रास होत असेल, तर रुग्णांनी तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात लोकांकडून मोठ्या प्रमाणात तेलकट, बाजारातील गोड पदार्थ खाण्यात आले आहेत. महाप्रसादाच्या नावे तेलकट पदार्थांचा जास्त वापर झाला आहे. प्रसादाकरिता बाजारातून आणलेले पेढे, मोदकांमधूनही निकृष्ट पदार्थ खाण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण चार-पाच दिवसांपासून शहरातील रुग्णालये, दवाखान्यांमध्ये खोकला, घसा खवखवण्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विविध श्वसनाच्या आजाराने बाधित असलेले, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती अशांना घशाचे त्रास वाढल्याचे दिसून येत आहे.

बाह्य रुग्णांमध्ये वाढ
गणेशोत्सवाच्या काळात पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाह्य रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या रुग्णालयात रोज अडीच ते तीन हजार रुग्ण येत आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेरूनही वाढ झाली आहे. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या ७०० वरून हजारापर्यंत पोहोचले आहे. आरोग्य उपकेंद्रांमध्येही श्वसनमार्गातील संसर्ग, ताप आणि अंगदुखी, घसा खवखवणे, खोकला या प्रकारचे रुग्ण वाढलेले दिसून येत आहेत.

दुर्लक्ष केल्यास धोका
घसा, छाती, श्वसनाच्या आजार हे गंभीर आजारात मोडतात. कोणाला तीन-चार दिवसांपेक्षा जास्त दिवस हा त्रास असेल, तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अन्यथा न्यूमोनियासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. श्रीजीत शिंदे यांनी केले आहे.

आहारात स्वच्छ व घरगुती पदार्थांचा समावेश करणे, तसेच गरम पाणी व गुळण्यांचा वापर करणे, मास्क, सॅनिटायझर वापर करणे, तेलकट, बाजारातील गोड पदार्थ खाणे टाळावे, प्रसाद म्हणून स्वच्छ सकस फळांचा वापर करावा, प्रसादासाठी शक्यतो सुका मेवा असावा.
- डॉ. कैलास पवार, शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com