ज्ञानमाता सदनने गाठला शैक्षणिक प्रवासाचे शतक महोत्सव

ज्ञानमाता सदनने गाठला शैक्षणिक प्रवासाचे शतक महोत्सव

Published on

कासा, ता. ८ (बातमीदार) : आदिवासी भागातील शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेले ज्ञानमाता सदन संस्थेने यंदा आपला शैक्षणिक प्रवासाची उद्या (ता. ९) शंभरी पूर्ण करणार आहे. १९२३ मध्ये जर्मन फ्रान्सिस्कन ब्रदर्स झरोलीमार्गे तलासरीत दाखल झाले, तेव्हा सुरू झालेला नीतीमूल्य, आरोग्य व सामाजिक जाणिवेचा अनौपचारिक शिक्षणप्रवाह पुढे संस्थात्मक रूप घेत गेला. ‘खेडे तेथे शाळा’ या ध्येयाने अनेक शाळा स्थापन झाल्या.

१९३४ मध्ये स्थापन झालेल्या ज्ञानमाता शाळेतून सुरुवात होऊन आज संस्थेत ११ प्राथमिक शाळा, चार विद्यालये आणि दोन कनिष्ठ महाविद्यालये मिळून १७ शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये सुमारे ७,५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, १८६ शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. बहुतांशी कर्मचारी हे स्थानिक समाजातूनच असून, शिक्षणासोबत सामाजिक विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. संस्थेच्या विकासात फादर बाप्तिस्ता, फादर न्युबिओला, फादर रेजी घोन्साल्वीस, फादर स्टॅनी मिरांडा, फादर गिली रेगो, फादर एड्रियन, फादर डायन लोबो आदी धर्मगुरूंचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी शाळा, वसतिगृहे, व्यावसायिक प्रशिक्षण, शिस्तप्रिय शिक्षण, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा, शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे शैक्षणिक गुणवत्तावृद्धी साधली. मुलींच्या शिक्षणासाठी विविध सिस्टर संस्थांचा सहभागही लक्षणीय ठरला.

या शतकभराच्या प्रवासात ज्ञानमाता सदनमधून अनेक धर्मगुरू, डॉक्टर्स, अभियंते, शिक्षक, वकील, पत्रकार, साहित्यिक, कृषितज्ज्ञ, समाजसेवक घडले. विद्यार्थ्यांच्या विचारसरणीत बदल, राहणीमानाची उंची, संस्कृतीची देवाणघेवाण आणि जगाशी ओळख या माध्यमातून संस्थेने आदिवासी समाजाचा बहुआयामी विकास घडवून आणला.

आज संस्थेचा शतकमहोत्सव हा केवळ शिक्षणाचा उत्सव नसून समाजाच्या प्रगतीचा प्रवास आहे. स्थानिक प्रापंचिकांच्या सहकार्याने पेटवलेली ज्ञानज्योत लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश फाकवत आहे. पुढील काळातही या प्रवासाला उंच भरारी मिळावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.

विविध पुरस्कारांनी गौरव
ज्ञानमाता सदनने ‘आनंदमेळा’, ‘पालकदिन’, ‘शैक्षणिक साहित्य कार्यशाळा’, आंतरशालेय क्रीडा स्पर्धा यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेला वाव दिला. संस्थेतील झरी आश्रमशाळेला ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या प्रकल्पात जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक, तर उपलाट हायस्कूलला तालुका स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तसेच शिक्षक लोकशाही आघाडीकडून ग्रामीण भागातील उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com