ठाण्यात पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती

ठाण्यात पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : उच्च न्यायालयाने सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने कृत्रिम तलाव आणि विशेष हौदांची व्यवस्था केली होती. तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृतीही करण्यात आली. या उपक्रमाला ठाणेकर भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मागील वर्षी २८ हजार चार मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलाव आणि हौदात झाले होते. यंदा त्यात तब्बल १९ हजार ५५१ ने वाढ होऊन ४७ हजार ५५५ मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आली आहे.
खाडीतील प्रदूषण कमी करण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी ठाणे पूर्वेतील अष्टविनायक चौकात खेळाचे मैदान खोदून कृत्रिम तलाव तयार करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावात करण्यात आले. तर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित केले. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यास सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. ठाणे पूर्व भागातील चेंदणी कोळीवाडा जमात कोळी ट्रस्ट यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांनीही विरोध केला होता. पालिका क्षेत्रातील इतरही काही भागांत कृत्रिम तलावाला नाराजी व्यक्त केली होती. या सर्व विरोधाला फाटा देत ठाणेकर भाविकांनी पर्यावरणपूरक अशा गणेशमूर्तीच्या विसर्जनाला पसंती दिल्याचे दिसून आले.
मागील वर्षी कृत्रिम तलाव आणि विशेष हौद (टाकी)मध्ये २८ हजार चार गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा त्यात १९ हजार ५५१ ने वाढ होऊन ४७ हजार ५५५ मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.

१३२ ठिकाणी विसर्जन व्यवस्था
फिरत्या हौद विसर्जनात यावर्षी वाढ करून पथकांची संख्या १५ केली होती. यावर्षी २४ कृत्रिम तलाव, ७४ टाकी विसर्जन व्यवस्था, १५ फिरत्या विसर्जन व्यवस्था, नऊ घाट विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण १३२ ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे. गतवर्षी एकूण ८८ विसर्जन व्यवस्था होत्या.

.........................................

दहा दिवसांची आकडेवारी

दीड दिवस यंदा मागील वर्षी
कृत्रिम तलाव १२९७० ८७००
विशेष हौद (टाकी) २६१३ १६२१

पाच दिवस यंदा मागील वर्षी
कृत्रिम तलाव ५९९९ ३९४८
विशेष हौद (टाकी) १५३२ ५८१

सात दिवस यंदा मागील वर्षी
कृत्रिम तलाव १२५९७ ७३९०
विशेष हौद (टाकी) ३६६६ ११४९

अनंत चतुर्दर्शी (दहा) दिवस यंदा मागील वर्षी
कृत्रिम तलाव ६६९९ ३९९४
विशेष हौद १४७९ ६२१

-------------------------
ठाणे पालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला होता. उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी कृत्रिम तलाव व विशेष हौद (टाकी) व्यवस्था उपलब्ध केली होती. त्याला ठाणेकर भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाची परंपरा ठाणेकरांनी कायम राखली.
- संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com