वाहतूक नियमांचे उल्लंघन
वाहतूक नियमांचे उल्लंघन
दुचाकी व रिक्षाचालकांकडून नियमभंग सर्वाधिक; पादचाऱ्यांचेही हाल
ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : शहरातील प्रमुख चौकांमध्ये चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. विशेषतः दुचाकी आणि रिक्षा चालवणारे चालक नियमांची पायमल्ली करत असून, त्यामुळे इतर शिस्तबद्ध चालक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे सर्व प्रकार अगदी वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत घडत असून, नियमभंग करणाऱ्यांची संख्या इतकी मोठी आहे की प्रत्येकावर कारवाई करणे प्रत्यक्षात अशक्य ठरत आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालयात लाखोंच्या संख्येने वाहने आहेत. आयुक्तालयातील एकूण १७ वाहतूक उपविभाग वाहतुकीच्या नियोजनाचे काम करतात, तर मुंबई नाशिक महामार्ग, ठाणे गुजरात महामार्ग, मुंबई आग्रा महामार्ग महत्त्वाचे महामार्ग ठाणे आयुक्तालय क्षेत्रातून जातात. त्यामुळे आयुक्तालय क्षेत्रात सिग्नल चौकांची मोठी संख्या आहे. या ठिकाणी वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. चौकातील झेब्रा क्रॉसिंगजवळचे स्टॉप लाइन ओलांडून वाहन उभे करणे, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, असे प्रकार सर्रासपणे घडताना दिसून येत आहेत.
बेशिस्त वाहनचालकांवर कर्तव्यावर असलेले वाहतूक विभागाचे कर्मचारी वेळोवेळी कारवाई करतात. नियम मोडणाऱ्या वाहनाचा फोटो काढून ऑनलाइन दंड पाठवतात; मात्र तरीही अशा बेशिस्तपणाला आळा बसल्याचे दिसून येत नाही. कार, रिक्षा, मोटरसायकल अशा प्रकारची हलकी वाहने चालवणाऱ्या चालकांकडून या प्रकारचे गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून दिसून येत आहे.
प्रमुख चौकांतील परिस्थिती
ठाण्यातील तीन हात नाका, नितीन सिग्नल, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, कासारवडवली या प्रमुख चौकांमध्ये वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या शहरांमधील चौकांमध्येही अशीच स्थिती आहे.
पादचाऱ्यांचे हाल
रस्ते ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे ठिकठिकाणी रंगवले गेले आहेत, पण आज त्यांची स्थिती फारच खराब झाली आहे. अनेक ठिकाणी पट्टे पूर्णपणे पुसट झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते.
उपाययोजना आवश्यक :
वाहनांची गती मोजण्यासाठी मुख्य रस्त्यांवर स्पीड कॅमेरे बसवणे, तसेच चौकांमध्ये स्वयंचलित सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे. यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई शक्य होईल आणि बेशिस्तीला आळा बसेल.
ठाण्यात विविध ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे बनवण्यात आले आहेत; मात्र हे पट्टे पुसट झाले असून, वाहतूक पोलिसांसमोरच त्या पट्ट्यांवर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे.
- संपदा टेंबे, शिक्षिका, ठाणे
वाहतूक विभागाच्या कारवाईचे आकडे (जानेवारी ते ऑगस्ट)
प्रकार कारवाई
सिग्नल तोडणे ४१,५४४
स्टॉप लाइन क्रॉसिंग ३४,५५७
तीनजण बसणे (ट्रिपल सीट) २२,२६०
चुकीच्या दिशेने वाहन ३,९०८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.