रेल्वे मार्गामुळे औद्योगिक विकासाला गती
विरार, ता. ८ (बातमीदार) : मुंबईच्या उपनगरी प्रवासाला नवा पर्व देणारा पनवेल-बोरिवली-वसई उपनगरी रेल्वे मार्ग अखेर प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिल्यामुळे लाखो प्रवाशांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. या मार्गामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे थेट रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रवाशांना कुर्ला वा वडाळा येथे गाडी बदलण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
वसई-बोरिवली-पनवेल या मार्गाची एकूण लांबी ६९.२३ किमी असून, उभारणीसाठी १२ हजार ७१० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पनवेलहून थेट बोरिवली व वसईपर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. आतापर्यंत या दोन टोकांदरम्यान प्रवाशांना केवळ गाडी बदली करून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अपव्यय होत होता. हा नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासातील सोयीसुविधा मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि दररोज लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मुंबई महानगर प्रदेशात सतत वाढणारी लोकसंख्या आणि त्यासोबत वाढणारा प्रवासी ताण लक्षात घेता हा नवीन कॉरिडॉर अत्यावश्यक ठरत आहे. यामुळे विद्यमान मार्गावरील ताण कमी होईल आणि रेल्वेसेवा अधिक सुरळीत व नियोजनबद्ध करता येईल. हा मार्ग पनवेल-कर्जतप्रमाणे पूर्णपणे स्वतंत्र स्वरूपात उभारण्यात येणार असून, विद्यमान पनवेल-दिवा-वसई मार्गदेखील कायम ठेवला जाणार आहे. या मार्गामुळे केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे. हा मार्ग केवळ प्रवासाला दिलासा देणारा नसून तो उपनगरी मुंबईच्या सामाजिक व आर्थिक विकासालाही गती देणारा ठरणार आहे. पनवेलहून बोरिवली व वसईपर्यंतची थेट जोडणी उपलब्ध झाल्याने पूर्व-पश्चिम दळणवळणाचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
या जिल्ह्यांच्या विकासाला चालना
भिवंडी परिसरातील वस्त्रोद्योगाला याचा विशेष फायदा होईल. हजारो कामगारांना कमी वेळेत प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय नवी मुंबई, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यातील वाढणारे औद्योगिक प्रकल्प या नव्या मार्गामुळे अधिक गतिमान होतील. परिणामी रोजगारनिर्मितीला चालना मिळेल आणि आर्थिक व्यवहार अधिक वेगाने होतील.
१५ हजार कोटींची गुंतवणूक
बदलापूर, कर्जतदरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका व आसनगाव-कसारादरम्यान चौथी मार्गिका उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांवर अनुक्रमे एक हजार ३२५ कोटी आणि ८७१ कोटी रुपये खर्च होणार आहे. एकूण पाहता या सर्व उपक्रमांचा खर्च तब्बल १४ हजार ९०७ कोटी असून, मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीत ही गुंतवणूक ऐतिहासिक ठरणार आहे.
पनवेल-बोरिवली-वसई उपनगरी रेल्वे मार्ग हा विशेषतः भिवंडी परिसरासाठी वरदान ठरणार आहे. वस्त्रोद्योग आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा हातभार लागेल. ही मागणी मी गेली दोन दशके सातत्याने मांडत होतो, ती अखेर पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.
- राजीव संघल, सदस्य, पश्चिम रेल्वे प्रवासी सल्लागार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.