धारावीत डेंगी, मलेरिया व हिवतापाचे सावट
धारावीत डेंगी, मलेरिया, हिवतापाचे सावट
मुसळधार पावसाने रुग्णसंख्येत वाढ
धारावी, ता. ८ (बातमीदार) : मागील काही दिवसांपासून मुंबईतील धारावी परिसर मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीपासून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता येथे डेंगी, मलेरिया आणि हिवतापाचे रुग्ण वाढले आहेत. दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात मुंबईतील धारावी आणि इतर भागांत या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असते, मात्र यंदा प्रादुर्भाव अधिक गंभीर आहे. धारावीत ४० वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा करणारे अनुभवी डॉक्टर अनिल पाचनेकर यांनी सांगितले. की पावसाळ्यामुळे झालेल्या पूरसदृश परिस्थितीनंतर डेंगी आणि मलेरियाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढले आहेत. दररोज कमीत कमी १५ रुग्ण डेंगी आणि मलेरियाच्या आजारांवर उपचारासाठी येत आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मृत्यूची घटना झालेली नाही, पण सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी धोका कायम आहे.
धारावीतील स्थानिक कार्यकर्ता ईश्वर ताथवडे म्हणाले, की मुसळधार पावसामुळे घरांमध्ये आणि दुकानात साचलेले पाणी डासांच्या वाढीस कारणीभूत ठरत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डेंगी, मलेरिया आणि हिवतापाचा प्रादुर्भाव वाढला आहे. डॉ. फुरकान शेख यांनीही सांगितले, की सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची दुरवस्था, जागोजागी साचलेले पाणी आणि अस्वच्छता या परिस्थितीमुळे डासांची संख्या वाढते. त्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. धारावीतील साई हॉस्पिटलचे डॉ. खालिद यांनीही यंदा पावसाळ्याच्या पूरसदृश परिस्थितीनंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढल्याचे म्हटले आहे. पावसाळ्यात धारावीमध्ये डेंगी, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस (हिवताप)चा प्रादुर्भाव अधिक वाढतो, असे स्पष्ट केले. यशवंत (बंटी) सोनवणे यांना सहा दिवसांपासून हिवताप आहे. त्यांनी सांगितले की, तीव्र ताप आला. यामुळे रक्ततपासणी करून रुग्णालयात भरती झालो. तीन दिवस आयसीयूमध्ये उपचार घेतले आणि नंतर सामान्य वॉर्डात ठेवले.
आरोग्य विभागाकडून सावधगिरी
धारावीतील आरोग्य विभागाने जनजागृती मोहिमेत वाढ केली असून, पाणी साचू नये, घराभोवती स्वच्छता ठेवावी तसेच डासरोधक उपाय वापरण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.