मुरबाडमध्ये रिक्षाचालकांकडून लूट
मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : शहरात रिक्षा प्रवाशांचे हाल होत असून त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. शहरात कुठेही प्रवास करण्यासाठी रिक्षा हा प्रमुख पर्याय असला तरी रिक्षाचालकांकडून भाड्यातील मनमानी, नियमांकडे दुर्लक्ष आणि प्रवाशांशी होत असलेली लुबाडणूक या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहराची लोकसंख्या वाढली असून वस्तीही चारही दिशांनी विस्तारली आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण, बाजारपेठ किंवा बँक कामांसाठी दररोज शेकडो नागरिक शहरात प्रवास करतात. मात्र, एसटी सेवेची मर्यादित उपलब्धता आणि लांब पल्ल्याच्या रस्त्यांवर बस न मिळाल्यामुळे नागरिकांना रिक्षावर अवलंबून राहावे लागते. या सेवेत शिस्त नसल्यामुळे नागरिक अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण यांच्यामार्फत रिक्षाचे भाडे निश्चित करण्यात आले होते. किमान भाडे २६ रुपये निश्चित असतानाही प्रत्यक्षात ३० रुपये आकारले जात आहे.
औद्योगिक वसाहतींसाठी चालवल्या जाणाऱ्या शेअर रिक्षांमध्ये पाच-सहा प्रवासी कोंबून त्यांच्याकडून मनमानी भाडे वसूल केले जाते. प्रवाशांच्या तक्रारीनुसार, रिक्षाचालक मीटर सुरू करत नाहीत. गणवेश वापरत नाहीत आणि कधी कधी प्रवास करण्यास नकारही देतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.
नागरिकांच्या मते, प्रवास भाडे निश्चित करून ते काटेकोरपणे राबवले गेले पाहिजे. तसेच ठराविक भागांमध्ये शेअर रिक्षा सुरू केल्या गेल्यास सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. रिक्षाचालक, पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या पद्धतीला नियमबद्ध स्वरूप दिल्यास प्रवाशांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल.
रिक्षाशिवाय पर्याय नाही
मुरबाड परिसरातील लांबाची वाडी, साजई, मडक्याचा पाडा, तोंडलीकर नगर, शास्त्रीनगर, माळीनगर, विद्यानगर, डोहले पाडा, देवगाव, वेहेरे वाडी, टाकीची वाडी, कुडवली, घुट्याची वाडी या ठिकाणांहून दररोज शेकडो लोक मुरबाड शहरात येतात. मात्र, बस सेवेच्या अभावामुळे हे सर्व लोक रिक्षांवरच अवलंबून आहेत. कुडवली औद्योगिक वसाहत, एसटी स्टँड, बाजारपेठ, बँका या ठिकाणी नेहमीच प्रवाशांची गर्दी असते; पण योग्य वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
नागरिकांची मागणी
रिक्षाचालकांकडे परवाना, परमिट व कागदपत्रे तपासावीत, मीटर भाडे काटेकोरपणे अमलात आणावे आणि प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जाणार नाही, यासाठी तपासणी मोहीम सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. शिवाय प्रवाशांनी तक्रार नोंदवण्यासाठी अधिकृत केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या अडचणी कमी होऊ शकतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.