स्थगिती आदेश असताना शौचालयाचे काम सुरू!
स्थगिती आदेश असताना शौचालयाचे काम सुरू!
मुंबई, ता. ८ ः ‘कुलाबा येथील लायन गेटजवळील शौचालय बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या कामाला स्थगिती देण्याचा आदेश राज्य सरकारने पालिकेला दिला होता. त्यामुळे आदेश न मानणाऱ्यांवर कारवाई करा,’ अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
दक्षिण मुंबईत शौचालये बांधण्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने स्थगितीचा आदेश दिला होता, तरीही पालिकेने लायन गेटसमोर शौचालयाचे बांधकाम पुन्हा सुरू केले आहे. याप्रकरणी मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवून राज्य सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विधानसभेत आमदार अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी चौकशी होईपर्यंत दक्षिण मुंबईतील १४ शौचालयांची कामे स्थगित करण्यात येतील, अशी घोषणा सभागृहात केली होती. ‘पादचाऱ्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी जागा सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे,’ असेही नार्वेकर म्हणाले.