न्यायाधीशांच्या सदनिकेच्या स्लॅब कोसळला
न्यायाधीशांच्या सदनिकेचा स्लॅब कोसळला
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : कोपरी पूर्व येथील बारा बंगला परिसरातील शासकीय निवासस्थानामधील इमारतीत राहत असलेल्या न्यायाधीशांच्या सदनिकेच्या छताचे स्लॅब कोसळल्याची घटना रविवारी (ता. ७) घडली. याप्रकरणी न्यायाधीश यांच्या पतीने दिलेल्या तक्रारीत वेळोवेळी डागडुजी करण्यास सांगूनही दुरुस्तीची कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या स्लॅबचा काही भाग कोसळून कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने याला जबाबदार असलेल्या संबंधित काम पाहणारे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचा (पीडब्ल्यूडी) हलगर्जी व निष्काळजी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आला असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोपरी पूर्व, बारा बांगला परिसरात ठाणे जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, डॉक्टर, पोलिस, न्यायाधीश यांच्यासाठी शासकीय निवासस्थान आहे. अशाच निवासस्थानात संबंधित सदनिका २०२३मध्ये न्यायाधीशांना दिली आहे. न्यायाधीश त्यांच्या कुटुंबासह तेथे वास्तव्यास आहेत. त्यातच ती इमारत जुनी असल्याने त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या न्यायाधीशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या. परंतु संबंधित विभागाकडून इमारतीमध्ये कोणतीही डागडुजी झाली नाही. रविवारी (ता. ७) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार घरी असताना अचानक मोठा आवाज झाला. त्यांनी तो आवाज सदनिकेमध्ये जाऊन पाहिल्यावर स्लॅबचा काही भाग पडल्याचे त्यांना दिसून आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, परंतु या घटनेनंतर न्यायाधीशांच्या पतीने याबाबत कोपरी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.......