ओएनजीसी संवेदनशील प्रकल्पात आग,
ओएनजीसी प्रकल्पात आग
नागाव परिसरातील घरांना हादरे
उरण, ता. ८ (वार्ताहर) : ओएनजीसीच्या गॅस प्रक्रिया प्रकल्पात सोमवारी (ता. ९) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट होऊन अग्नितांडव निर्माण झाल्याची घटना घडली. या वेळी उंचच उंच ज्वाळा आणि धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आजूबाजूच्या परिसराचे नुकसाने झाले आहे.
उरण येथील ओएनजीसी प्रकल्पात अनेक वेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातच सोमवारी दुपारच्या सुमारास मोठा स्फोट होऊन यामध्ये आगीने रौद्र रूप धारण केले. या स्फोटामुळे परिसरातील नागावसह अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड हादरे बसले, अनेकांच्या घरांच्या काचा फुटून नुकसान झाले. स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की, संपूर्ण परिसर दणाणून गेला. स्फोटानंतर उठणारा काळा धूर व प्रचंड ज्वाळा पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
गॅस पाइपलाइन गरम झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, ओएनजीसीचे अग्निशमन पथक तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी तत्काळ धाव घेत अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आग आणखी भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून प्रकल्पाच्या आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. सुरक्षा कारणास्तव गॅसपुरवठाही तात्पुरता बंद ठेवण्यात आला असून, परिस्थिती स्थिर करण्यासाठी प्रशासन आणि ओएनजीसी प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे, मात्र वारंवार घडणाऱ्या गॅसगळती, स्फोट आणि आगीमुळे उरण व परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाल्याची भावना स्थानिकांनी या वेळी व्यक्त केली. तसेच रहिवाशांनी या दुर्घटनेबाबत सखोल व पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
गॅस प्रक्रिया प्रकल्पात सोमवारी दुपारी आग लागली, काही वेळानंतर या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळविले. जुन्या पाइपलाइनचे काम चालू असताना गॅसगळती होऊन ही आग लागली. आजूबाजूच्या परिसरात नुकसान झाल्याची कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आली नाही.
- उद्धव कदम, तहसीलदार, उरण
स्फोटाची घटना मोठी होती; आगही मोठ्या प्रमाणात लागली होती; परंतु आता तिच्यावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे, परंतु आजूबाजूच्या परिसरातील काही खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. आम्ही सध्या पाहणी करत आहोत.
- चेतन गायकवाड, सरपंच, नागाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.