राज्यात शिक्षणाचा दीप उजळतोय, नवसाक्षरांची संख्या ११ लाखांपर्यंत पोचली.
राज्यात शिक्षणदीप उजळतोय
नवसाक्षरांची संख्या ११ लाखांवर; मुंबई, ठाण्यात प्रगती
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः राज्यात मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या नवभारत साक्षरता अभियान (उल्लास) या उपक्रमाने देशभरात गौरवपूर्ण कामगिरी बजावली आहे. या कालावधीत राज्यात तब्बल १० लाख ८९ हजार ७४० तरुण आणि प्रौढ पुरुष आणि स्त्रियांना नवसाक्षर करण्याची किमया केली आहे. यात मुंबई, ठाण्यासह पुणे, नागपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये नवसाक्षरांची संख्याही कमालीची वाढली आहे.
यात २०२३-२४ या वर्षात चार लाख २५ हजार ९०६, तर २०२४-२५ या वर्षात तब्बल सहा लाख ६३ हजार ५६४ अशा एकूण १० लाख ८९ हजार ७४० जणांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीच्या माध्यमातून नवसाक्षर केले असून, येत्या पाच वर्षांत राज्य संपूर्ण साक्षर करण्याचा वसा राज्य योजना शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. राज्यात १ ते ८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साक्षरता सप्ताह साजरा केला जात असून, त्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांत राज्याने तब्बल १० लाख ८९ हजार ७४० नवसाक्षर केले असल्याने साक्षरांची संख्या कमालीची वाढली आहे. यासाठी विभागाकडून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला असल्याची माहिती शिक्षण (योजना) संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात २०११च्या जनगणनेनुसार राज्यात एक कोटी ६३ लाख असाक्षर आहेत. त्यात असाक्षर राहिलेल्यांपैकींना २०२६-२७ पर्यंत नवसाक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एक कोटी ६३ लाखांपैकी मागील काही काळात प्रौढ शिक्षण, निरंतर शिक्षण, साक्षर भारत कार्यक्रम आदींच्या माध्यमातून लाखो नागरिक साक्षर झाले आहेत. त्यातील उरलेल्या आणि उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमात २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत २९ लाख १३ हजार ४२१ असाक्षरांची नोंदणी झाली आहे.
...
नवसाक्षरांचा उल्लास नवभारत साक्षरता हा कार्यक्रम केंद्राच्या निर्देशानुसार सुरू आहे. मागील दोन वर्षांत घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीला ११ लाख ३१ हजार ४७० जण बसले होते. त्यातील केवळ ४२ हजारांचा अपवाद वगळता तब्बल १० लाख ८९ हजार ४७० जण नवसाक्षर झाले, हे या कार्यक्रमाचे मोठे यश आहे.
- कृष्णकुमार पाटील, शिक्षण संचालक (योजना)पुणे
...
असे झाले नवसाक्षर
१७ मार्च २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीला चार लाख ५९ हजार ५३३ बसले होते. त्यापैकी चार लाख २४ हजार ९०६ जण ही परीक्षा उत्तीर्ण झाले, तर यापैकी ३३ हजार ६७२ जणांना साक्षर होण्यासाठी अधिकची सुधारणा गरजेची असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे २३ मार्च २०२५ रोजी झालेल्या चाचणीला बसलेल्यांची संख्या दोन लाखांनी वाढून ती सहा लाख ७१ हजार ९३७ पर्यंत पोहाचली आणि त्यातून सहा लाख ६३ हजार ५६४ जण उत्तीर्ण झाले. यात अधिकची सुधारणा असलेल्यांची संख्या कमी होऊन ती आठ हजार ३७३ वर आल्याची माहिती संचालकांनी दिली.
...
२०२४-२५ मधील नवसाक्षर
शहर ॲपवरील नोंदणी प्रत्यक्ष नोंदणी चाचणीला बसलेले एकूण उत्तीर्ण
मुंबई उपगर ३०,४६१- १२,१२७- १०,९४०- १०,८६९
मुंबई शहर १४,९११- ४,४३८- २,७२४- २,६४०
ठाणे २१,६५७- १८,६२४- २५,५६७- २५,०३७
रायगड १२,१०८- ९,३७९- १०,५०८- १०,२२२
पालघर २९,१२४- २३,८७२- २५,३३०- २५,११८
पुणे ३८,३०८- ३९,४१६- ३६,१५४- ३५,१७५
नागपूर १७,४८४- १५,३८७- १४,५९२- १४,०८४
छ. संभाजीनगर २४,३१५- १६,४६८- १६,२९६- १६,१५१
कोल्हापूर २४,७१०- ३०,०९९- २९,४९३- २९,४१३
लातूर १८,५६३- १५,३८७- १४,४९०- १४,२९९
गडचिरोली ११,७४३- १४,१६९- ४३,२५५- ४१,७४४
अमरावती १०,६८७- ९,८०९- १४,२२०- १४,०२१
नाशिक २९,७२४- २१,२४४- २७,६६९- २७,६४७
इतर सर्व ५,७८,४०३- ५,७८,६२३- ६,७१,९३७- ६,६३,५६४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.