श्रीधर फडके
श्रीधरजींचे गीत
सुमधूर अन् बोलके!
आशीष शेलार यांचे गौरवोद्गार
मुंबई, ता. ९ ः प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांचे राग, लय, आलाप आणि रचना वेगवेगळ्या आहेत, पण त्यांचे प्रत्येक गाणे हे सुमधूर संगीतासोबत बोलके गीत ठरते. त्यातला जिवंतपणा नेहमीच जाणवतो. त्यांनी शंभरी गाठावी आणि तेव्हा मी मंत्री असो वा नसो, त्यांनी मला त्यांच्या कार्यक्रमाला बोलवावे अशी माझी इच्छा आहे, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी काढले.
फडके यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विशेष सांगीतिक कार्यक्रम ‘झाले मोकळे आकाश...’ मंगळवारी मोठ्या उत्साहात दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी-जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात फडके यांच्या बहुरंगी संगीत प्रवासातील निवडक गीतांचा ठसा उमटवणारे सादरीकरण ऋषिकेश रानडे, सोनाली कर्णिक, अभिषेक नलावडे, धनश्री देशपांडे आणि शिल्पा पुणतांबेकर यांनी केले. या कार्यक्रमात फडके यांचे पगडी-शाल देऊन सत्कार करण्यात आले तसेच ७५ दिव्यांनी त्यांना औक्षण करण्यात आले.