मोठागाव खाडी किनारी अवैध वाळू उत्खननावर कारवाई
अवैध वाळू उत्खननावर कारवाई
मोठागाव खाडी किनारी ३४ लाखांची सामुग्री नष्ट
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : पश्चिमेतील मोठागाव खाडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उत्खननावर सोमवारी (ता. ८) कल्याण तहसीलदार यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान दोन बार्ज आणि दोन सक्शन पंप खाडी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसताना आढळून आले.
कल्याण तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, अप्पर मंडळ अधिकारी आणि शिपाई-कोतवाल यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईची कल्पना मिळताच काही मजुरांनी खाडीत उड्या मारून पळ काढला. एका बोटीवरील लोकांनी सक्शन पंपमध्ये पाणी सोडल्यामुळे तो जागेवरच बुडवण्यात आला. उरलेले दोन बार्ज आणि एक सक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने तोडून नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण अंदाजे ३४ लाख रुपयांची साधनसामुग्री नष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. मोठागाव खाडी परिसरात बेकायदा वाळू उत्खननाच्या तक्रारी सतत येत असल्याने ही कारवाई करण्यात आली.प्रशासनाने अशा अवैध वाळू उत्खननावर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.