मुरूड तालुक्यात भात शेती तरारली

मुरूड तालुक्यात भात शेती तरारली

Published on

मुरूड तालुक्यात भातशेती तरारली
२,१४९ मि. मी. पावसामुळे बळीराजा सुखावला; यंदा उत्पादनवाढीची शक्यता
मुरूड, ता. ११ (बातमीदार) : मुरूड तालुक्यात यंदा खरीप हंगाम समाधानकारक ठरत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तब्बल २,१४९ मि.मी. पाऊस पडल्याने भातशेती तरारली असून, शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुबलक पावसामुळे भातपिकाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत भातावर करपा वा किडीचा प्रादुर्भाव झालेला नसल्याने बळीराजाने दिलासा व्यक्त केला आहे.
मुरूड तालुक्यात सुमारे ३,२०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. जया, सुवर्णा, रूपाली, शुभांगी, चिंटू, वाडा कोलम हे प्रमुख वाण असून पाणथळ व खारजमिनीत पनवेल १, २, ३ या नवीन वाणांची लागवड केली जाते. उथळ किंवा उखारू जमिनीत पारंपरिक पद्धतीने हळव्या वाणांची लागवड केली जाते. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार, भातपिकासाठी १००:५०:५० (नत्र-स्फुरद-पालाश) आदी खतांचे प्रमाण दिले जाते. नत्राची मात्रा तीन हप्त्यांमध्ये द्यायची असून, सध्या पिकाची गर्भावस्था/निसवणी अवस्था असल्यामुळे उर्वरित युरिया खताचा तिसरा हप्ता देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रति गुंठा ७२८ ग्रॅम युरिया या प्रमाणात देणे आवश्यक आहे. तथापि, पिकाची वाढ जास्त असल्यास युरिया कमी द्यावा अन्यथा पीक खराब होण्याचा धोका असल्याचे कृषितज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. भातपिकाची वाढ समाधानकारक असल्याने यंदा उत्पादनात वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परिस्थिती अधिक चांगली असून, हवामान पोषक राहिल्यास शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील.
..............
गरव, निमगरव आणि उखारू जमिनीवरील भातपीक ९० ते १५० दिवसांत तयार होते. मात्र या पिकावर डुकरांचा उपसर्ग नेहमीच मोठा अडथळा ठरतो. अद्याप १०० टक्के प्रभावी उपाय नसला तरी सोलर फेन्सिंग व झटका मशीन याद्वारे काही प्रमाणात संरक्षण मिळत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सारांश, मुरूड तालुक्यातील भातशेती यंदा उत्साहवर्धक अवस्थेत असून, बळीराजा उत्पादनवाढीच्या आशेने सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com