सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, मद्यपींचा उच्छाद
सानपाडा रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ले, मद्यपींचा उच्छाद
जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : सानपाडा रेल्वे स्थानक परिसर दिवसेंदिवस असुरक्षित व बकाल होत चालला आहे. स्थानकालगत बाहेरील किऑस्क भागात खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी असून, या ठिकाणी अनेक जण चायनीजसारखे पदार्थ सेवन करत मद्यपान करतात. त्यातच काही ठिकाणी अमली पदार्थांचे सेवनही होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. परिणामी स्थानक परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, स्थानिक नागरिकांनी पोलिस व सिडको प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
गर्दुल्ले, मद्यपी व अमली पदार्थांच्या विळख्यामुळे सानपाडा रेल्वे स्थानक परिसर अक्षरशः दुर्गंधीयुक्त बकाल झाला आहे. खाद्य विक्रेत्यांच्या कचऱ्यामुळेही परिसर स्वच्छतेअभावी विद्रुप दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे सेक्टर २, ३ आणि ८ मधील नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः महिलांनी असुरक्षिततेची भावना व्यक्त केली असून, स्थानकातून घरी जाताना भीतीचा वातावरण निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. स्थानक परिसरातील गर्दुल्ल्यांमुळे महिलांवर अनेकदा गैरवर्तनाचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. रात्रीच्या वेळी तर मद्यपींचा उच्छाद वाढतो. स्थानकातून बाहेर पडताच या लोकांचा त्रास सहन करावा लागतो. परिणामी, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा परिसर धोकादायक ठरत आहे.
......................
नागरिकांची संतप्त मागणी
परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणली नाही, तर सानपाडा परिसर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकून बसेल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. रहिवासी संघटनांनी याबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच परिसर स्वच्छ करा आणि परप्रांतीयांच्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.