बँकेत नोकरीच्या प्रलोभनाने तरुणीला १३ लाखांचा गंडा
बँकेत नोकरीच्या प्रलोभनाने तरुणीला १३ लाखांचा गंडा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : स्टेट बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावतो, असे प्रलोभन दाखवत एका ३० वर्षीय तरुणीला डोंबिवलीतील त्रिकूटाने १३ लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तेजस कनोजिया, किरण वाघमारे आणि रजनी कनोजिया या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यात दोन महिलांचा समावेश आहे.
वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या ३० वर्षीय तक्रारदार या एका नामांकित बँकेत डेप्युटी मॅनेजरपदावर काम करतात. तक्रारदार या फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या मैत्रिणीच्या साखरपुड्याला मुंबई कुलाबा या भागातील ताज हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्या वेळी त्याच मैत्रिणीने त्यांची ओळख डोंबिवलीतील तेजस कनोजिया यांच्याशी करून दिली. त्या भेटीदरम्यान तेजस याने त्यांना त्याचा कन्सल्टंटचा व्यवसाय असून तो लोकांना नोकरी लावण्याचे काम करतो. तसेच त्याची स्टेट बँक ऑफ इंडिया येथे उच्च अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे, असे सांगून त्यांना स्टेट बँकेत अधिकारी म्हणून तो ऑर्डर आणून देईन; परंतु त्या कामासाठी १५ लाख द्यावे लागतील, असे म्हटले. त्या वेळी त्याने तक्रारदारांना काही रेफरन्स दाखविल्याने त्यांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. दरम्यान, २५ एप्रिल २०२३ मध्ये ठाण्यात त्याने त्याची मैत्रीण किरण वाघमारे हिच्याशी ओळख करून दिली. तसेच, दीपक याच्यासोबत फोनवरून बोलणे होत असल्याने त्याला किती दिवसांनी काम होईल, अशी नेहमी विचारणा केली. तेव्हा त्याने तक्रारदारांना माझ्यावर विश्वास नसेल तर नोटरी करून देतो, असे सांगितले. तसेच, यावर्षी ४ जुलैला त्या काम करीत असलेल्या बँकेत येऊन प्रतिज्ञापत्र दिले. त्यात त्याने त्यांना नोकरी नाही लावली तर घेतलेली पूर्ण रक्कम परत करू, असे म्हटले. त्यामुळे तक्रारदार तरुणीने आरोपीची आई रजनी व मैत्रीण किरण यांच्या खात्यावर व रोख स्वरूपात पैसे दिले. १ ऑगस्टला तक्रारदारांनी कॉल केला असता तेजस आणि किरण या दोघांचे फोन बंद आले. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी तेजसच्या राहत्या घरी गेले असता त्या घराला कुलूप लावल्याचे दिसले. आजूबाजूला विचारणा केल्यावर कोणालाही काही माहीत नाही. दरम्यान, फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.