घोडबंदर मार्गाची साडेसाती
घोडबंदर मार्गाची साडेसाती
कोंडीला सात कारणे जबाबदार; वाहतुकीचा त्रास वाढला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : मध्य मुंबई आणि पश्चिम मुंबईला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या घोडबंदर रस्त्याला सध्या साडेसातीने घेरले आहे. मेट्रोची कामे, अवजड वाहने, रस्त्यांवरील खड्डे, बॉटलनेक, गायमुख घाटाची दुरवस्था अशा एक नव्हे, सात कारणांमुळे घोडबंदर मार्ग रोजच कोंडीत सापडत आहे. याचा सर्वाधिक त्रास ठाणेकर आणि घोडबंदर पट्ट्यातील रहिवाशांना होत आहे. अवघ्या अर्धा तासांच्या अंतरासाठी तासन्तास कोंडीत अडकावे लागत आहे. या त्रासाला कंटाळून घोडबंदरवासीयांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे येत्या काळात घोडबंदरची वाहतूक हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
ठाण्याहून वसईला जाण्यासाठी किंवा मुंबईला जाण्यासाठी घोडबंडर मार्ग हा महत्त्वाचा मानला जातो. मुंबई-अहमदाबाद मार्ग असल्याने याचे महत्त्व अधिक आहे; पण हा मार्ग वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाला आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी या मार्गावर होणारी अभूतपूर्व कोंडीने नाकीनऊ आणले आहेत. वाढत्या वाहन संख्येवर नियंत्रण नाही. दुसरीकडे रस्ते दुरुस्ती खड्ड्यात जात आहे. ध्वनी, वायू प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने नवीन ठाणे म्हणून ओळख असलेल्या घोडबंदर पट्ट्यामध्ये वास्तव्याला आलेल्या रहिवाशांंच्या अडचणी वाढल्या आहेत. दिवसेंदिवस सहनशीलता संपत चालल्याने नुकतेच येथील रहिवाशांनी खड्ड्यांमध्ये शीर्षासन करून अनोखे आंदोलन केले; पण त्यानंतरही परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले. हलक्या तसेच जड वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असतानाही घोडबंदरची दयनीय अवस्था का होत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सात कारणे समोर आली आहेत.
अवजड दुखणे
घोडबंदर मार्ग मुंबईला जोडणारा आहे. तसेच गुजरातच्या सुरत-अहमदाबाद मार्गाचा प्रमुख दुवा आहे. त्यामुळे गुजरात ते भिवंडी, जेएनपीए पट्ट्यात जड आणि मालवाहू गाड्यांची वर्दळ या मार्गावर असते. येथील कोंडीला हे अवजड दुखणे प्रमुख असल्याचे निदर्शनास आले आहे. घोडबंदर मार्गावर वाहनांची येण्याची व जाण्याची वेळ निश्चित करून दिली असली तरी त्याने समस्या सुटलेली नाही. मध्यंतरी परिवहनमंत्र्यांनी अवजड वाहनांना घोडबंदरऐवजी भिवंडीचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला; पण हा प्रयोग व्यवहार्य नसल्याचे समोर आल्याने आजच्या घडीला घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या सत्रात घोडबंदर मार्ग कोंडीत अडकत आहे.
मेट्रोची संथगती
ठाण्यात मेट्रोची कामे सुरू आहेत. भविष्यात या मेट्रोमुळे वाहतुकीला सक्षम पर्याय निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे; पण या कामांमुळे सध्या घोडबंदर मार्ग कोंडीत सापडला आहे. मेट्रोचे काम रात्रीच्या वेळेस ब्लॉक घेत करण्यात येते; मात्र हे काम सकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येत असते. या कामात दिरंगाई झाली तर त्याचा थेट फटका सामान्य वाहतूकदारांना बसतो. दुसरीकडे मेट्रो कामासाठी लागणारे साहित्य व वाहने उभी राहत असल्याने कोंडीत भर पडते. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यात होणारी धूळ-माती, खडक यामुळेदेखील वाहनांची गती कमी होत आहे.
सेवा रस्त्यांची दुरवस्था
घोडबंदर मार्गावरील मोठ्या प्रमाणात मेट्रोचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडचीदेखील दुरवस्था झाली आहे. अनेक सर्व्हिस रोड हे बंद असल्याने कोंडत भर पडत आहे.
वाहनसंख्या, अपघात
घोडबंदर मार्गावरून रोज हजारो वाहनांची वाहतूक होते. नोकरी-व्यवसायासाठी निघणारी वाहने एकाच वेळी रस्त्यावर येत असल्याने सकाळ- संध्याकाळ हा मार्ग कोंडीत अडकतो. त्यात या मार्गावर एखादे अवजड वाहन बंद पडले अथवा अपघात झाला की संपूर्ण दिवस कोंडी होते.
खड्ड्यांचे दुष्टचक्र
राष्ट्रीय महामार्ग असला तरी घोडबंदर रस्त्याला खड्ड्यांचे दुष्टचक्र आहे. मानपाडा, वाघबीळ, आनंदनगर अशा विविध भागात रस्त्यांच्या मध्ये अनेक खड्डे पडल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरायचे कुणी, असा वाद निर्माण होतो. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीसी, ठाणे महापालिका संयुक्तपणे खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेते; पण आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही खड्ड्यांची समस्या तशीच राहिल्याने कोंडीत भर पडते.
गायमुखवर दमछाक
घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट हा सध्या वादाचा विषय ठरला आहे. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घाटरस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश देऊनही परिस्थिती बदललेली नाही. निमुळता रस्ता, वळणे, चढणामुळे येथील वाहतूक मंदावते. या घाटावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रवास लांबत आहे. हलक्या आणि जड-अवजड वाहनांना त्या ठिकाणाहून प्रवास करण्याकरिता मोठी दमछाक होते.
हद्द आणि परवानग्यांची अडचण
घोडबंदर मार्ग ठाणे महापालिका, मिरा-भाईंदर महापालिका आणि वनविभागाच्या अख्यत्यारित येतो. येथील बराचसा भाग हा वनपट्ट्यात असल्याने त्याचे रुंदीकरण अनेकवर्षे रखडले आहे. महापालिका हद्दीतील सेवा रस्ते घोडबंदर मार्गात समाविष्ट करून रुंदीकरण केले जात आहे; पण शहरातून बाहेर पडताच गायमुख दिशेने हा मार्ग जाताना पुन्हा निमुळता होत आहे. जोपर्यंत गायमुखचे रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे.
कोंडीचे हॉटस्पॉट
- माजिवडा जंक्शन
- कापूरबावडी जंक्शन
- मानपाडा ते वाघबीळ
- गायमुख घाट ते चेना ब्रिज
कोंडी होण्याची वेळ
- सकाळी ७ ते ११
- सायंकाळी ६ ते रात्री १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.