महिला प्रवाशांसोबत उद्धट वर्तन करणाऱ्या एसटीच्या ट्रॅफिक कंट्रोलर विरोधात प्रवाशी आक्रमक
एसटी वाहतूक नियंत्रकाचे महिला प्रवाशांसोबत उद्धट वर्तन
प्रवासी आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सफाळे डेपो व्यवस्थापकाला घेराव
मनोर, ता. १४ ः सफाळे एसटी डेपोच्या वाहतूक नियंत्रकाने महाल प्रवाशांना अरेरावीची भाषा वापरल्याने याविरोधात महिला प्रवासी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या वर्तणुकीविरोधात डेपोच्या व्यवस्थापकाला घेराव घालत त्यांनी जाब विचारला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करीत वाहतूक नियंत्रक मोहन पाटील यांनी महिला प्रवाशांची जाहीर माफी मागितली. दरम्यान, मोहन पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.
सफाळे डेपोत बसेसची संख्या कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळेत ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होते. यामुळे एसटीच्या कारभाराविरोधात प्रवाशांमध्ये संताप आहे. अनेक बसेस भंगारात काढण्यात आल्या असून, नव्याने दाखल झालेल्या बसेस लांबच्या फेऱ्यांसाठी पाठवल्या जातात. अशात संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांची संख्या बसच्या क्षमतेपेक्षा अधिक होत असल्यामुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत असते.
शुक्रवारी संध्याकाळी सफाळे डेपोतील कोरे गावाच्या फेरीतील बसमध्येही गर्दी अधिक झाल्यामुळे एडवण गावासाठी वेगळ्या बसची मागणी करण्यात आली. या मागणीसाठी महिला प्रवाशांनी बस अडवली होती. यावर चर्चा करण्यासाठी वाहतूक नियंत्रक मोहन पाटील तेथे आले असता त्यांचा प्रवाशांसोबत वाद झाला. या वेळी मोहन पाटील यांनी महिला प्रवाशांसोबत अरेरावची भाषा केल्याने उपस्थितांचा पारा चढला. यावरून शनिवारी सफाळे डेपो व्यवस्थापकांना धारेवर धरत प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मोहन पाटलांच्या जाहीर माफीची मागणी केली होती. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलकांसोबत चर्चा केल्यानंतर मोहन पाटील यांनी जाहीर माफी मागितली.