‘वाचन वेडे'' स्पर्धेत स्वप्निल पाटील ठरला अव्वल

‘वाचन वेडे'' स्पर्धेत स्वप्निल पाटील ठरला अव्वल

Published on

वाचन वेडे'' स्पर्धेत स्वप्निल पाटील ठरला अव्वल
वाडा, ता.१५ (बातमीदार) : मराठी भाषा संस्कृती संवर्धन प्रचार - प्रसार या हेतूने ठाणे येथील अजेय संस्था मागील काही वर्षापासून काम करत आहे. याच संस्थेच्या माध्यमातून वाचन संस्कृतीच्या बळकटी करणासाठी ''वाचन वेडे'' या स्पर्धेचे पाचवे वर्ष होते. दीड महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा ठाणे येथील सरस्वती विद्यामंदिर येथे पार पडला. या स्पर्धेत सात गटांमधून तब्बल ४२ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये दीड महिन्यातील अव्वल सादरीकरणासाठी स्वप्निल पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत एकूण सात गट होते. गटनिहाय प्रत्येक सदस्याने एक पुस्तक निवडून त्या पुस्तकावर आधारित ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगली होती. स्पर्धेत अनेक नामांकित कवी, लेखक, साहित्यिक सहभागी झाले होते. अमेरिका, कॅनडा या देशांमधूनही या स्पर्धेत सहभागी सदस्य होते. डॉ. क्षितिज कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही आगळीवेगळी स्पर्धा केवळ स्पर्धा नसून वाचनाचे वेड कसे असावे, ते कसे जपावे, वाचन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारी होती अशी प्रतिक्रिया येथील सहभागी स्पर्धकांनी दिली. अंतिम स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रसिद्ध लेखिका संगीता काळभोर व लेखक प्रशांत कासार यांनी काम पाहिले. प्रत्येक गटाला दिवाळी अंकांचे नाव देऊन या गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक माहेर गट, द्वितीय क्रमांक मौज गट व तृतीय क्रमांक अक्षर गटाने मिळवला. या स्पर्धेत अव्वल ठरलेले माहेर गटाचे स्वप्निल पाटील हे पेशाने शिक्षक असून शिवव्याख्याते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने विविध पुस्तकांचे अभिवाचन करून स्वतःसह इतरांनाही वाचनाचा आनंद देत असतात. मराठी भाषा व पुस्तक वाचनाच्या प्रचार प्रसारासाठी आपल्या अभिजात मराठी साहित्य सेवा संघाच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com