इपीएस पेन्शनधारकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू
पालघर, ता. ६ (बातमीदार) : इपीएस पेन्शनधारकांच्या व्यथा जाणवत असून केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी दिले. जिल्हा पातळीवरील पेन्शनधारकांच्या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार राजेंद्र गावित यांनी अध्यक्षपदावरून संबोधित केले.
पालघर येथील विठ्ठल मंदिर सभागृहात हा मेळावा आयोजित केला होता. या वेळी आमदार राजेंद्र गावित, खासदार डॉ. सवरा यांचा सत्कार संघटनेचे वतीने कार्याध्यक्ष अशोक राऊत व खजिनदार रवींद्र कदम यांनी केला. जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर यांनी पेन्शनधारकांच्या व्यथा मांडताना सांगितले की, इपीएस पेन्शनधारक आज देशातील सर्वात उपेक्षित वर्ग असून एक हजार ते साडेतीन हजार रुपयांचे अत्यल्प पेन्शन मिळते. कोशियारी अहवालाप्रमाणे नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता ही आमची रास्त मागणी आहे. बँकाचे ठेवीवरील व्याजदर सातत्याने कमी होत असल्यामुळे अधिकच कुचंबणा होत आहे. कोरोना काळात काढून घेतलेली रेल्वे तिकीट सवलतही पूर्ववत करण्याची मागणी इपीएस पेन्शनधारकांनी केली. तसेच दोन महिन्यांत न्याय न मिळाल्यास डिसेंबरमध्ये दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.
खासदार हेमंत सवरा यांनी या तिन्ही मागण्यांचा पाठपुरावा करत त्यांच्यासोबत असल्याचा शब्द दिला.
राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दरमहा सात हजार रुपये मानधन देण्याचे राजपत्र काढले आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार गावित यांनी दिले. या वेळी विलास ठाकूर, संघटक सचिव हेमंत पाटील, उपाध्यक्ष भगवान सांबरे, टी. के. पाटील, सुभाष मोरे, शांताराम पाटील, जयप्रकाश झवेर, विलास जाधव, दीपक जोशी आदीनी निवृत्तीवेतनधारकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.