नवी मुंबईत कमी पावसाची नोंद

नवी मुंबईत कमी पावसाची नोंद

Published on

नवी मुंबईत कमी पावसाची नोंद
मागील वर्षापेक्षा सुमारे ६५० मिमीने घट; पाणीपुरवठा होणार सुरळीत
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबईत यंदा पावसाळा समाधानकारक झाला असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण घटले आहे. १ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत शहरात एकूण ३,२९६.१३ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती गेल्या वर्षीच्या ३,९५९.६० मिमी पावसाच्या तुलनेत सुमारे ६६३ मिमीने कमी आहे. तथापि, धरण क्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने मोरबे धरण १००.३५ टक्के क्षमतेने भरले आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांतील पाणीपुरवठ्यात अडथळा येणार नाही.
नवी मुंबई हे कोकण किनाऱ्यालगत असल्याने येथे दरवर्षी २,५०० ते ३,००० मिमी पावसाची सरासरी अपेक्षा असते. मात्र हवामानातील बदल आणि अनियमित पावसामुळे यंदा प्रमाण घटले आहे. शहराच्या सीबीडी बेलापूर, वाशी, नेरूळ आणि ऐरोली अशा विभागांत असमान पर्जन्यमानाची नोंद झाली. विशेषतः पावसाच्या पहिल्या टप्प्यात बेलापूर व सीबीडी परिसरात जोरदार सरींमुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, तर पुढील टप्प्यात पावसाचा जोर ओसरला. मोरबे धरण क्षेत्रात मात्र ४०६५.६ मिमी पाऊस झाला असून, २० ऑगस्ट २०२५ रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याची नोंद आहे. २०१८, २०१९, २०२१ आणि २०२४ या चारही वर्षांत धरण भरले होते; परंतु २०२०, २०२२ आणि २०२३ मध्ये ते अपूर्ण राहिले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात पाणीसाठा चांगला आहे, ही दिलासादायक बाब आहे.
...................
गेल्या काही वर्षांतील पावसाची आकडेवारी
२०१५ मध्ये १,६१४.०४ मिमी
२०१६ मध्ये २,७०६.४२ मिमी
२०१७ मध्ये ३,१२३.७८ मिमी
२०१८ मध्ये २,६३६.७८ मिमी
२०१९ मध्ये विक्रमी ४,४१९.११ मिमी
...................
एल निनोचा प्रभाव
तज्ज्ञां‍च्या मते, एल निनो आणि हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील किनारी भागात पावसाचे स्वरूप बदलले असून, यंदा पावसाचा कालावधी कमी पण तीव्रतेने विभागलेला होता. महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने सांगितले, की मोरबे धरण पूर्ण भरल्याने शहराला पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरेसे पाणी उपलब्ध राहील; मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे भान ठेवणे आवश्यक आहे. या वर्षीच्या पावसाने नवी मुंबईला काही प्रमाणात दिलासा दिला असला, तरी हवामानातील अस्थिरता आणि बदलत्या पर्जन्यमानाचे आव्हान कायमच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com