दसरा संपताच फुलांच्या भावात चारपट घसरण
दसरा संपताच फुलांच्या भावात चारपट घसरण
आवकही घटली, आता विक्रेत्यांना दिवाळीची प्रतीक्षा
जिवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईत या वेळी फुलांची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. त्यामुळे दसऱ्याला दादरच्या फुल मार्केटमध्ये फुलांचे भाव गगनाला भिडले होते. दसऱ्याच्या दिवशी फुलांची उलाढाल कोट्यवधीमध्ये होते, मात्र दसऱ्यानंतर फुलांचे भाव ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहेत. त्यामुळे फुलांना योग्य भाव मिळवण्यासाठी आता विक्रेते दिवाळीची वाट पाहात आहेत.
राज्यात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. नवरात्रोत्सव व दसऱ्याला पूजा-अर्चा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुलांची खरेदी करतात, मात्र अतिवृष्टीमुळे उत्पादन कमी झाल्यामुळे फुलांचे भाव वाढले. त्यामुळे इतर दिवशी स्वस्तात मिळणारा झेंडू दसऱ्याच्या दिवशी प्रतिकिलो २०० रुपये, तर मोगरा, अबोली प्रतिकिलो ८०० रुपये, तर चमेलीचे भाव ६०० रुपये प्रतिकिलोवर गेले होते. त्यामुळे बहुतांश ग्राहकांनी स्वस्त मिळणाऱ्या अन्य फुलांचा पर्याय निवडला, मात्र महत्त्वाच्या फुलांचे भाव वाढल्यामुळे, ग्राहक कमी झाले तरी विक्रेत्यांचे नफ्याचे गणित फारसे बिघडले नाही. दसऱ्यापूर्वी व दसरा, या दोन दिवसांत दादरच्या फुल बाजारात अंदाजे २५ ते ३० कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते.
विक्रेत्यांचे म्हणणे काय?
आता फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले असून, फुल बाजारात झेंडू प्रतिकिलो २० रुपये व अन्य फुले प्रतिकिलो २०० रुपयांवर गेले आहेत. महत्त्चाचे उत्सव संपल्यामुळे बाजारात फुलांची आवक आणि फुलाचे भावही चार पटीने घसरले आहेत. त्यामुळे फुलांना चांगले भाव मिळण्यासाठी सध्या तरी दिवाळीची प्रतीक्षा करावी लागेल, तोपर्यंत लग्न विधी इतर छोट्या-मोठ्या सणांवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे फुल व्यापाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
दिवाळीपर्यंत फुलांची आवक कशी राहणार आहे यावरही व्यवसायाचे बरेचशे चित्र अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
आता फुलांच्या किमतीत ६० टक्के घसरण झाली आहे. दिवाळी सणापर्यंत फुलांची आवक वाढेल व भाव वाढतील, अशी आशा आहे.
– सोपान दुराफे, फुलविक्रेते, दादर
प्रत्येक सणाला फुलांच्या भावात चढउतार होत असतात. दसऱ्याला फुलखरेदी सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली होती. आता भाव स्थिर झाले आहेत.
– विश्वनाथ चौधरी, फुलविक्रेते, दादर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.