पालिकेवर महिला राज
पालिकेवर महिलाराज
नगराध्यक्षसाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर
बदलापूर, ता. ६ (बातमीदार) ; राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सोमवारी (ता. ६) नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगर पंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा केली. राज्यातील ६७ नगर परिषदांचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले असून, या ६७ नगर परिषदांपैकी ३४ ओबीसी महिलांसाठी आरक्षित केले आहे. त्यात कुळगाव -बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी राखीव झाले असून, शहरात आता नगराध्यक्षपदासाठी कोणकोणत्या महिला उमेदवार असणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
२०१५ मध्ये कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची शेवटची निवडणूक पार पडली. २०२० मध्ये पालिका बरखास्त झाल्यानंतर, कोरोनामुळे या निवडणुका पुढे पाच वर्षांपर्यंत प्रलंबित राहिल्या; मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी पूर्वीच घ्याव्यात, असे आदेश आल्यानंतर आता निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ता. ६ ऑक्टोबर रोजी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली असून, ओबीसी महिलेसाठी ही जागा आरक्षित झाली आहे.
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनंतर बदलापूर शहरात लोकसंख्या अमाप वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षीय नेत्यांना आता मतांची गणिते कशी फिरणार? या द्विधा मनस्थितीत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे हे निवडून आले. विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीचे उमेदवार किसन कथोरे हे निवडून आले. त्यामुळे कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत महाविकास आघाडी स्वतःचे अस्तित्व उभे करणार की, महायुतीची सत्ता पुन्हा येणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. या पाच वर्षांत शहरातील विविध पक्षाच्या माध्यमातून केलेली कामे, पक्षातील नेत्यांचे चरित्र, त्यांचे नेतृत्व या सगळ्यांवर यंदा बदलापूरकर जास्त लक्ष देणार आहेत. त्यामुळे पाच वर्षांनंतर निवडणुका लागल्यामुळे, कोणत्याही पक्षाला पुढचा अंदाज व्यक्त करणे कठीण झाले आहे. आता नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर, पालिकेतील निवडणुकीसाठी युती होणार का? युती झाली तर उमेदवार कोण असतील, युती नाही झाली, तर उमेदवार कोण असतील, यासंदर्भात अनेक नावे सध्या चर्चेत आहेत.
मोर्चेबांधणीला वेग
स्थानिक स्तरावर शिवसेना शहरप्रमुख व भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यात असलेल्या मतभेदामुळे, बदलापूर शहरात महायुती होणार का? किंवा सेनेला वगळून भाजप राष्ट्रवादी सोबत युतीचा प्रस्ताव करेल, अशाही चर्चांना उधाण आले आहे. काही असले तरी नगराध्यक्षपद हे महिला ओबीसीसाठी आरक्षित झाले असून, यासाठी सेनेकडून वीणा म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून प्रियांका दामले, भाजपकडून रुचिता घोरपडे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधून मनसेच्या संगीता चेंदवणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर शहरात सगळ्याच पक्षांनी आपली कंबर कसली असून, आगामी निवडणुकीत कोण सत्तेवर येणार? नगराध्यक्ष कोण होणार? यावर विविध तर्कवितर्कांना वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.