पालिका प्रकल्‍पांना अडथळ्यांची शर्यत!

पालिका प्रकल्‍पांना अडथळ्यांची शर्यत!

Published on

पालिका प्रकल्‍पांना अडथळ्यांची शर्यत!
खर्चात भरमसाठ वाढ; प्रशासकीय अनास्था, आचारसंहितेचाही फटका
विष्णू सोनवणे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मुंबईसाठी विविध विकास प्रकल्पांची पालिका प्रशासनाने आखणी केली. त्यातील गेल्या १० वर्षांत मुंबईकरांसाठीचे अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. त्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढत आहे. त्याचा आर्थिक भार पालिकेला सहन करावा लागतो. प्रशासकीय अनास्थेमुळे हे प्रकल्प पुढे सरकू शकले नाहीत. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा फटका विकास प्रकल्पांना बसला. त्यामुळे पालिकेचे हे प्रकल्प म्हणजे अडथळ्यांची शर्यतच ठरली आहे.
प्रशासकीय अनास्था आणि लोकसभा, विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता याचा फटका प्रकल्पांना बसत आहे. कंत्राटदार हे प्रकल्पास दिरंगाई करीत असून, त्यामुळे प्रकल्पांच्या किमती वाढत आहेत. करदात्या मुंबईकरांच्या निधीचा अशा पद्धतीने गैरवापर होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांकडून प्रशासनावर सातत्याने होत आहे.
मुंबई महापालिकेत २०२३मध्ये वांद्रे, हुतात्मा चौक आणि वरळी अशा तीन ठिकाणी भूमिगत पार्किंगची योजना राबविण्याचे ठरविले. त्यासाठी ३०० कोटींच्या निविदा काढण्याचेही ठरले. मात्र या प्रकल्पाला निधी, तांत्रिक आव्हाने अशा अनेक गोष्टींचे अडथळे आल्याने हे प्रकल्प मागे पडले. मुंबई महापालिकेच्या समोर भुयारी वाहनतळ बांधण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. तत्कालीन माजी स्थायी समिती अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तसेच भुलेश्वर मंदिराजवळ भुयारी वाहनतळ बांधण्याचे ठरविले होते, मात्र स्थानिकांनी या प्रस्तावाला विरोध केला आणि तो बारगळला. मुंबईतील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी शहरात भुयारी पार्किंग करण्याचे प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत. त्यासाठी प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुमारे १५ वर्षांपासून थांबलेले आहेत. हे प्रकल्प पुनर्जीवित करण्याचा निर्णय झाला आहे. प्रकल्‍पामुळे बाधित झालेल्या नागरिकांना पर्यायी घरे देण्याचे वचन दिले, पण पुरवठा झाला नाही. ठेकेदाराची अडचण, आर्थिक, तांत्रिक अडथळे, जमीन हस्तांतरण, स्थलांतर यांसारख्या कारणांमुळे अडथळे निर्माण झाले आहेत. महापालिकेच्या ६४ भूखंडांवर एकूण ५१ हजार ५८२ झोपड्या असून, त्यापैकी १७ योजनांमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. उर्वरित ४७ योजनांसाठी निविदा मागवल्या असता ८६ विकसकांनी स्वारस्य दाखवले. यातील २१ योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला; मात्र आठ योजनांना एकच तर १८ योजनांना एकही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या २६ योजनांसाठी पुन्हा स्वारस्य अभिव्यक्ती (ईओआय) मागवण्यात आली आहे.

भुयारी पार्किंग बारगळले
मुंबई महापालिका २०१९मध्ये एक धोरण मंजूर केले. विकास आराखडा २०३४मध्ये मैदाने आणि उद्याने यांच्या खाली भुयारी पार्किंग बांधता येईल. यासाठी पार्किंग बांधणाऱ्या खासगी विकसकांना टीडीआर देण्याचे पालिकेने ठरविले. या धोरणाला राजकीय विरोध झाल्यामुळे हे धोरणही बारगळले.

मोगरा आणि माहुल जलक्षेपण केंद्र मंजुरीच्या प्रतीक्षेत
२६ जुलै २००५च्या महापुरानंतर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत आठ ठिकाणी मुंबईत पावसामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या क्षमतेची जलक्षेपण केंद्रे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी सहा जलक्षेपण केंद्रे तयार झाली असून, मोगरा आणि माहूर केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहेत. जमीन हस्तांतरण आणि केंद्र सरकारच्या मंजुरीची या प्रकल्पांना प्रतीक्षा असल्याचे समजते.

शाळांच्या इमारती खासगी संस्थांना जाण्याची भीती
मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा जीर्ण झाल्‍या असून, मोडकळीस आल्या आहेत. त्यांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. मुंबईतील पालिकेच्या १० शाळांच्या इमारतींचा पुनर्विकास करून त्या शाळा बहुमजली बांधण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. मात्र या शाळा खासगी संस्थांच्या घशात जातील की काय, अशी शंका शिक्षण खात्याकडून व्यक्‍त करण्यात येत आहे.

अतिविशेष उपचार सुविधा रुग्णालयांची गरज
अतिविशेष उपचार सुविधा असलेले रुग्णालय पूर्व आणि पश्चिम उपनगरांत बांधण्याचा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेचा प्रस्ताव आहे. पूर्व उपनगरांत भांडुपमध्ये त्यासाठी जागा निश्चित झाली आहे. मात्र पश्चिम उपनगरांत असे रुग्णालय नाही. तातडीने आणि अद्ययावत आरोग्याच्या सुविधा मिळण्यासाठी अशी रुग्णालये महत्त्वाची असतात; मात्र त्याबाबतही दिरंगाई झाली आहे

काँक्रीटचे रस्‍ते रेंगाळले
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँक्रीटचे रस्ते बांधण्याचे धडाकेबाज निर्णय घेतले. सुमारे साडेसहा हजार कोटींची कामे सुरू केली. मात्र या कामांत अनेक अडथळे आले. त्यामुळे या रस्‍त्‍यांची कामेही रेंगाळली आहेत.

१२ वर्षांत पाणीपुरवठा प्रकल्प नाही
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करणारी धरणे अपुरी पडत आहेत. मध्य वैतरणा धरणानंतर गेल्या १२ वर्षांत एकही पाणीपुरवठा प्रकल्प पालिकेने उभारलेला नाही. गारगई प्रकल्पही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

मुंबई महापालिकेचे प्रकल्प आणि त्यावरील खर्च पाहता प्रकल्पाच्या नावाखाली लूट सुरू आहे. करदात्यांच्या पैशाचा अशा पद्धतीने गैरवापर होत आहे, हे थांबलं पाहिजे. पालिका आमच्याकडे असताना आम्ही त्या प्रकल्पांचे नियोजन केले होते. मात्र राज्य सरकारने प्रशासक नेमला, प्रकल्पांना दिरंगाई झाली. प्रकल्पांच्या किमती वाढल्या.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर

मुंबई महापालिकेचा कोणताही प्रकल्प असो, प्रकल्पात दिरंगाई होता कामा नये. दिरंगाई होत असेल तर त्याची कारणे कंत्राटदरांनी द्यायला हवीत. मुंबईकरांच्या निधीचा गैरवापर होता कामा नये, यासाठी खबरदारी प्रशासन आणि कंत्राटदारांनीही घ्यायला हवी.
- रवि राजा, उपाध्यक्ष, मुंबई भाजपा

मुंबई महापालिका प्रशासनाला आणि ते प्रशासन चालवणाऱ्या सरकारला पालिकेचे प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये रस नाही. मुंबईकरांना सुविधा देण्यामध्ये त्यांना स्वारस्य नाही. प्रकल्प रखडवून त्या प्रकल्पांच्या किमती वाढवायच्या आणि त्याचा आर्थिक लाभ जवळच्या कंत्राटदारांना कसा देता येईल, यातच त्यांना अधिक रस आहे.
- सुरेशचंद्र राजहंस, प्रवक्ते, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com