आंबिवलीत फिल्मी स्टाईलने सराईत सलमान इराणीला अटक
आंबिवलीत सराईत चोरट्याला फिल्मी स्टाइलने अटक
पोलिसांवर नातेवाइकांचा हल्ला; थरार सीसीटीव्हीत कैद
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : राज्यातील अनेक ठिकाणी लूटमार करून दहशत माजवणारा सराईत चोरटा सलमान जाफरी उर्फ सलमान इराणी (वय ३५) अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पनवेल शहर पोलिसांनी ओळख पटवलेल्या या कुख्यात आरोपीला कल्याणजवळील आंबिवली येथील इराणी वस्तीतून फिल्मी स्टाइलने अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांवर झडप घालत त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला.
पनवेल शहरात एका सोनसाखळी चोरीच्या प्रकरणानंतर, पोलिसांनी सखोल तपास करून आरोपीची ओळख पटवली. यामधील आरोपी सलमान इराणी हा आंबिवलीतील एका वस्तीत राहत असल्याचे समोर आले. तत्काळ पनवेल शहर पोलिसांनी खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधून संयुक्त कारवाईचा निर्णय घेतला. खडकपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी विजय गायकवाड यांच्या पथकासह पनवेल पोलिसांचे पथक रविवारी (ता. ५) सकाळी इराणी वस्तीत दाखल झाले. पनवेल पोलिस रेल्वे फाटकाजवळ अडकल्याने खडकपाडा पोलिस आधी वस्तीत पोहोचले. तेव्हा सलमान इराणी दिसताच पोलिसांनी झडप घालत त्याला पकडले; मात्र सलमानने तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्याचे नातेवाईक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी सलमानला सोडवण्यासाठी पोलिसांवर हल्ला करून झटापट केली. तणावपूर्ण वातावरणातही पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत सलमानला घट्ट पकडून जेरबंद केले. काही वेळानंतर पनवेल पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले.
देशभरात हैदोस घालणारा सराईत गुन्हेगार
सलमान इराणी हा अत्यंत सराईत व कुख्यात गुन्हेगार असून, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात व देशभरात चोरी, लूटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. त्याच्या विरोधात पनवेल, भिवंडी, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठाण्यांमध्ये तसेच इतर राज्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर यापूर्वी अनेक वेळा हल्ले झाल्याची नोंद आहे. सलमान इराणी हा काही काळापासून फरार होता. अखेर त्याच्या अटकेमुळे सोनसाखळी चोरीसह अनेक गुन्ह्यांच्या उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.