मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध

मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध

Published on

मुरबे बंदराला स्थानिकांचा विरोध
जनसुनावणीत आठ हजारांहून अधिक विरोधी निवेदने
पालघर, ता. ६ : मुरबे बंदर उभारणीसाठी पालघरमध्ये घेण्यात आलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीला सोमवारी नागरिकांनी (ता. ४) कडाडून विरोध केला. बंदर उभारणीसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय मंजुरीसाठी तयार केलेल्या पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल त्रुटीयुक्त असल्याची टीका सर्वांनी एकमुखाने केली. हा अहवाल प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारित नसल्याने घेण्यात आलेली जनसुनावणी बेकायदा असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

पर्यावरण प्रभाव मूल्यांकनातील जैवविविधता, आरोग्य, पर्यावरण, मच्छीमारांच्या समस्या, रोजगार, असे अनेक विषय सुनावणीत समोर आले. १०३ जणांनी प्रत्यक्ष तक्रारी व्यासपीठासमोर नोंदवल्या. या सुनावणीत मुरबे, नांदगाव, कुंभवली, नांदगाव, आलेवाडी, सातपाटी यासह जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांतील शेतकरी, बागायतदार, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित होत. या जनसुनावणीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

मेसर्स जे. एस. डब्ल्यू कंपनी आणि सागरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मुरबे बंदर उभारले जाणार आहे. या बंदराच्या पर्यावरणीय परवानगीसाठी महाराष्ट्र पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयातर्फे पालघर जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर सोमवारी पर्यावरणविषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे उच्च अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. ही सुनावणी जनतेचे म्हणणे मांडण्यासाठी असून, आपले म्हणणे मांडावे, त्याची नोंद केली जात आहे, असे जिल्हाधिकारी जाखड यांच्याकडून सांगण्यात आले. यामध्ये आठ हजारांहून अधिक बंदर विरोधी निवेदने प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तक्रारी आणि म्हणणे नोंद झाल्यानंतर त्या राज्य पर्यावरणीय मूल्यांकन समितीकडे पाठवल्या जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सुनावणीच्या सांगण्यात आले. जेएसडब्ल्यू कंपनीकडून बंदर उभारले जाणार आहे. त्या कंपनीला हरित लवादाने दंड ठोठावला आहे. घाईघाईने हा अहवाल तयार केला आहे. टर्म्स ऑफ रेफरन्स देण्यानंतर केवळ ३७ दिवसांत प्रकल्पाचा अहवाल तयार कसा झाला, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. प्रभाव मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी तीन हंगामाचा अभ्यास करणे आवश्यक होते; मात्र तसे न करता अहवाल तयार करण्याची घाई का केली आणि अहवाल अभ्यास करून जनसुनावणी पुढे नेण्याची विनंती मान्य का केली नाही, असा प्रश्नांचा भडिमार येथे करण्यात आला.

आमदार, खासदार गैरहजर
मुरबे बंदर परिघात मत्स्य संस्था कार्यरत असून, एकही संस्थेला जनसुनावणीबाबतीत अवगत करण्यात आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. तसेच जनसुनावणीला जिल्ह्यातील एकही आमदार आणि खासदार उपस्थित नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात आला.


परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप
पर्यावरणीय जनसुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर पालघर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठाणे, रत्नागिरी येथून पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती. यामध्ये १२४ पोलिस अधिकारी, १,०६९ पोलिस कर्मचारी, आठ स्ट्रायकिंग पथके, एक राज्य राखीव पोलिस दल, दोन केंद्रीय राखीव दल, दोन जलद प्रतिसाद पथक यांचा समावेश होता. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे तीन अधिकारी व ३२ अंमलदार नेमण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com