मनोरुग्णलयाचे भूमिपूजन लांबणीवर

मनोरुग्णलयाचे भूमिपूजन लांबणीवर

Published on

मनोरुग्णालयाचे भूमिपूजन लांबणीवर
नव्या इमारतींना पर्यावरण, पालिकेच्या परवान्यांची प्रतीक्षा
ठाणे शहर, ता. ६ (बातमीदार) ः ठाण्यातील मनोरुग्णालयाच्या जागेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस रुग्णालय उभे असून, त्याकरिता सव्वाशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडायला सरुवात झाली आहे. शासनाकडून गेल्या वर्षी नवे रुग्णालय बांधण्याकरिता मंजुरी देण्यात आली आहे. मात्र ५६० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या इमारतींसाठी ठाणे महापालिका आणि पर्यावरण विभागाचा नाहरकत परवाना अद्याप देण्यात आला नसल्याने नव्या रुग्णालयाच्या कामाला आणखी विलंब होणार असल्याचे दिसते आहे.
देशातील प्रमुख जुन्या वास्तूंमध्ये ठाण्यातील मनोरुग्णालयाचा समावेश होतो. १९०१मध्ये हे रुग्णालय बांधण्यात आले आहे. रुग्णालयाच्या आवारात प्रशस्त मोकळी जागा, हजारो देशी झाडे, फुलांच्या बागा, प्रशस्त रस्ते आणि हवेशीर दुमजली दगडाच्या इमारती आहेत. यामध्ये देशभरातील मनोरुग्णांवर सव्वाशे वर्षांपासून उपचार होत आहेत. आजही येथे ७०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. महिला रुग्णांवरदेखील येथे स्वतंत्र उपचार होतात. मात्र आता या प्रशस्त मोकळ्या जागेतील रुग्णालय पाडून तेथे ३,२७८ रुग्ण क्षमतेचे रुग्णालय बांधले जाणार आहे. सध्या या रुग्णालयात १,८५० रुग्णांची क्षमता आहे. रुग्णालयाला शासनाची मंजुरी मिळाली असून, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी रुग्णालयाच्या इमारत बांधणीचे भूमिपूजन होण्याची शक्यता होती. नव्या इमारतीसाठी लागणारी ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अद्याप इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच पर्यावरण विभागाकडूनही या कामासाठी अद्याप हिरवा कंदील दाखवण्यात आलेला नसल्याने एका वर्षापूर्वी मंजुरी मिळूनही हे रुग्णालय ठाणे महापालिका आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

एकूण २६ इमारती बांधल्या जाणार
नव्या रुग्णालयाचा विकास बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेसच्या धर्तीवर होणार आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या कामाला मंजुरी दिली आहे. या जागेवर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दोन १२ मजली इमारतींसह एकूण २६ इमारती बांधल्या जाणार आहेत. रुग्णांसाठी पुनर्वसन केंद्र असणार आहे. मेंदू आजारी रुग्णांसाठी न्यूरो सायकॅट्रिक सर्जरी अँड ट्रीटमेंट अद्ययावत कक्ष उभारला जाणार आहे. लहान मुलांसाठी बाह्य विभाग, ईसीटी, व्यवसाय उपचार विभाग, रुग्णांच्या नातेवाइकांना राहता येईल, यासाठीदेखील तरतूद असणार आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून एक लाख १२ हजार चौरस मीटरचे बांधकाम होणार आहे. राज्य शासनाने नवीन बांधण्यात येणाऱ्या मनोरुग्णालयाला परवानगी दिली आहे. सध्या काही ठिकाणी जुने पाडकाम सुरू आहे. लवकरच संबंधित विभागाच्या परवानग्या मिळणार असून, कामाला आणखी गती येणार आहे.
- डॉ. नेताजी मुळीक, अधीक्षक, मनोरुग्णालय, ठाणे

Marathi News Esakal
www.esakal.com