सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले

Published on

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
ठाणेकरांच्या प्रश्नावर आज आयुक्तांच्या दरबारी बैठक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ ः शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस अशी महाविकास आघाडी ठाण्यात आहे. याला आता मनसेचे इंजिन जोडले गेल्यामुळे महाविकास आघाडीची गाडी रुळावर आणण्यासाठी येत्या काही दिवसांत जनआंदोलन उभारण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. ठाणेकरांना भेडसावणारा पाणीप्रश्न, वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या या ठळक मुद्यांसह वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला जाणार आहे. याबाबत मंगळवारी (ता. ७) पालिका आयुक्त सौरभ राव यांची सर्वप्रथम भेट घेण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्याची ही रणनीती समजली जात आहे.

ठाणे शहरात गेल्या वर्षांपासून वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घोडबंदरवासीयांना यासाठी आंदोलन उभारावे लागले. दुसरीकडे अनधिकृत बांधकामांवरून न्यायालयाचे खडे बोल ऐकावे लागत आहेत. असे असतानाही ठाणे महापालिकेचा कारभार सुधारत नसल्याने ठाणेकरांमध्ये नाराजी आहे. सध्या ठाणे महापालिकेवर प्रशासक राज्य असले तरी आधीच्या सत्ताधाऱ्यांचा अदृश्य हस्तक्षेप पाहायला मिळत असल्याचा आरोपही होत आहे. त्यात लाचखोर उपायुक्ताला रंगेहाथ अटक झाल्यामुळे पालिकेत सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. या सर्व प्रकारांमुळे विरोधकांना आगामी महापालिकेसाठी राळ उठवायला आयते कोलीत सापडले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ५) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आाणि मनसेचे अविनाश जाधव उपस्थित होते. ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभागरचनेच्या सुनावणीवेळीही हे चौघे एकत्र आले होते. त्यामुळे ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेची एण्ट्री झाल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या चारही पक्षांची ठाण्यात अवस्था कमकुवत असली तरी आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी हे चार चेहरे सज्ज होत आहेत.


मनसे देणार सक्षम पर्याय
पालिका निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षासोबतच्या युती-आघाडीबाबत निर्णय मनसेप्रमुख राज ठाकरे येत्या काळात घेतील; मात्र सध्याच्या परिस्थितीत ठाणेकरांना मनसेच्या माध्यमातून सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मविआच्या या बैठकीला उपस्थित राहिल्याचे मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com