नवी मंबईचे विमानतळ १२ तास खुले राहणार
नवी मंबई विमानतळाला १२ तासांची मर्यादा
एक महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सेवा मिळणार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ६ : जगातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून लौकिक असलेल्या लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी बरोबरी करणारे नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ फक्त १२ तास सुरू राहणार आहे. या विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबरला होणार आहे. त्यानिमित्ताने अदाणी समूहातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी सिडकोने अदाणीसोबत भागीदारीत ‘एनएमआयएएल’ नावाची कंपनी स्थापन केली आहे. ७४ टक्के भागीदारी अदाणी, तर २६ टक्के भागीदारी सिडकोची आहे. ८ ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण झाल्यानंतर विमानसेवा नियमित सुरू होण्यास डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, परंतु त्यानंतरही सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेतच विमानसेवा उपलब्ध होणार आहे. दर तासाने विमानाचे उड्डाण होईल, असे अदाणीतर्फे एएचएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी सांगितले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकर सुरू करण्याबाबत संबंधित कंपन्या आणि प्राधिकरणांसोबत चर्चा सुरू असल्याचे एनएमआयएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा यांनी सांगितले. विमानतळामध्ये असणाऱ्या नावीन्यपूर्ण वैशिष्ट्यांमुळे या विमानतळाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या काळात विमानांच्या उड्डाणाचे वेळापत्रक तयार होईपर्यंत काही विमानसेवा मर्यादित चालणार आहेत, परंतु त्यानंतर जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय सेवादेखील प्रवाशांना मिळू शकणार असल्याचे बीव्हीजेके शर्मा यांनी स्पष्ट केले.
मुंबई विमानतळावरील ताण जैसे थे!
मुंबई विमानतळाचे परीचलन अदाणी समूहातर्फे करण्यात येत आहे. तसेच आता नवी मुंबई विमानतळाचे व्यवस्थापनही अदाणींकडून करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळाला नवी मुंबईचे विमानतळ पर्याय म्हणून उभारण्यात आला आहे; मात्र त्यामुळे मुंबई विमानतळावरील विमान उड्डाणाचे प्रमाण कमी होणार नाही, असे स्पष्टीकरण अदाणींतर्फे अरुण बन्सल यांनी दिले. नवी मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यानंतर त्याची वाहतूकही मुंबई विमानतळाच्या तुलनेत वाढणार असल्याचे बन्सल यांनी सांगितले.
२०२९ला दुसरी टर्मिनल इमारत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिली टर्मिनल इमारत आणि एक धावपट्टी निर्माण करण्यासाठी अदाणी आणि सिडकोला २०२५ वर्ष उजाडावे लागले, परंतु या विमानतळावरील टर्मिनल क्रमांक २चे काम पूर्णत्वास येण्यासाठी २०२९ वर्ष उजाडणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ३ आणि ४ असे उर्वरित टर्मिनल इमारत उभारण्यात येईल. त्यानंतर ९० लाख प्रवासी प्रतिवर्ष इतक्या पूर्ण क्षमतेने नवी मुंबईचे विमानतळ कार्यान्वित होईल. सध्या २२ लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
नवी मुंबई कार्गो हब होणार
नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा संपूर्ण परिसर हा भविष्यात कार्गो हब होईल, असा विश्वास अदाणी समूहातर्फे व्यक्त करण्यात आला. नवी मुंबई विमानतळाहून ५ मॅट्रिक टन मालवाहतूक केली जाणार आहे, परंतु टप्प्याटप्प्याने ही क्षमता वाढवण्यात येणार आहे. पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणेद्वारे माल उतरवणे आणि चढवणे हाताळण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.