सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा न्यायसंस्थेकडूनही कृतीचा निषेध

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा न्यायसंस्थेकडूनही कृतीचा निषेध

Published on

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा निषेध
न्यायसंस्थेतील मान्यवरांकडून संतप्त प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी (ता. ६) हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुनावणीदरम्यान वकिलाकडून सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या वकिलाला वेळीच अडवल्याने मोठा अनर्थ टळला. ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही,’ असेही तो वकील न्यायालयातून बाहेर काढले तेव्हा ओरडत होता. दरम्यान, या कृतीचा न्यायसंस्थेतील मान्यवरांकडून निषेध करण्यात आला आहे.
...
ही कृती चुकीचीच आहे आणि निषेध करावा तितका कमी आहे. प्रथमदर्शनी हा न्यायालयाचा अवमान आहे. वकिलाने तारतम्य बाळगले पाहिजे. आपला राग व्यक्त करण्याची ही पद्धत नव्हे. एखादा निर्णय, वक्तव्य आवडले नसल्यास लोकशाही मार्गाने त्याला विरोध केला जाऊ शकतो. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर अशा कृतींना आळा बसलाच पाहिजे.
- निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर
...
देशाच्या सरन्यायाधीशांवर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा प्रयत्न करणे ही बाब खरंच खूप गंभीर आहे. कनिष्ठ न्यायालयात अर्जदारांकडून न्यायाधीशांवर असे हल्ले होत असतात; परंतु सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाकडून असे कृत्य घडणे घृणास्पद आहे. या कृतीमागे अन्य कोणाचा हात नाही ना, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
- निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे
...
अशा प्रकारच्या कृतीची आम्ही निंदा करतो. विचारांचा सामना हा विचारांनी करावा. कायदा हातात घेणे चुकीचे आहे.
- ॲड. उदय वारुंजीकर, उच्च न्यायालय
...
ही कृती विकृत आहे, यात दुमत नाही. उच्च अथवा सर्वोच्च न्यायालय असो, काही वकिलांनी तारतम्य आणि विवेकशीलता ही धर्म, धर्मांधता जातीय अभिनिवेश याला गहाण टाकल्याचे ही कृती उदाहरण आहे. न्यायमूर्तींच्या बोलण्यामागची क्षमता अथवा त्यामागील भाव समजून घेण्याची क्षमता आपण समाज म्हणून गमावून बसलो आहोत. हा मुद्दा अगदी खेळाच्या मैदानापासून ते राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांपर्यंत आणि आता तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. हा एक समस्याप्रधान भावनातिरेक आहे.
- ॲड. असीम सरोदे,
वकील, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय
...
ही निषेधार्थ बाब आहे. हा देशभरातील सनातन धर्माच्या राजकीय वातावरणाचा एक परिणाम आहे. २०२४मध्ये एससी/एसटीच्या वर्गीकरणाचा निर्णय दिल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांना निस्सीम राष्ट्रभक्त म्हणून गौरविणाऱ्या सनातन्यांच्या नजरेत हेच न्या. गवई आता व्हिलन कसे झाले? दुसरीकडे अयोध्या निकालानंतर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेल्या वक्तव्याचे काय? देशातील वाढत्या धर्मांध, सेक्युलरविरोधी राजकारण व समाजवर्चस्वासाठी घटनात्मक संस्थेवर आता हल्ले करणार का?
- सुरेश माने, ज्येष्ठ वकील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com