वीजसमस्या आ वासून!
कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्थेचा प्रश्न आजही गंभीर आहे. अनेक गाव-पाड्यांतील नागरिक वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. महावितरणकडून सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत असले, तरीही दुर्गम, डोंगरी भागांमध्ये वीजपुरवठा सतत खंडित होणे, हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विशेषतः पावसाळ्यात वारा-पावसामुळे ट्रिपिंगची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेक पाडे तासन्तास अंधारात राहतात.
सध्या डहाणू तालुक्यातील वीजपुरवठा व्यवस्थेअंतर्गत ५९ हजार ग्राहक आहेत. यामध्ये औद्योगिक मीटरधारक एक हजार ७००, तर शेती ग्राहक तीन हजार ५०० आणि सर्वसामान्य ग्राहक सुमारे २५ हजार आहेत. महावितरणला दरमहा मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो, मात्र अजूनही थकबाकीदारांची संख्या मोठी आहे. १६४ ग्राहकांवर वीजचोरीची प्रकरणे, तर ९४ प्रकरणांमध्ये सुमारे २९ लाखांची दंडवसुली करण्यात आली आहे.
डहाणू तालुक्यातील वीज विभागात एक उपविभागीय कार्यालय, दहा शाखा कार्यालये आणि सात उपकेंद्रे कार्यरत आहेत. येथे एकूण १६० कर्मचारी, त्यापैकी ६० बाह्य स्रोतांद्वारे कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत उच्चदाब तारा बदलण्यात आल्या असून, अनेक गावांमध्ये जुने व पडके खांब बदलून नवीन खांब बसविण्यात आले आहेत. तसेच अनेक ठिकाणी बंच केबल टाकून केबलीकरण करण्यात आले आहे.
कासा येथे १३२ केव्हीचे उपकेंद्र कार्यान्वित करून त्यास सूर्यनगर उपकेंद्राशी जोडणे अत्यावश्यक आहे. तसेच, कासा, चारोटी भागातील ११ केव्ही वाहिनी सुमारे ५० ते ८० किमी लांब अंतरावरून येत असल्याने, त्या ठिकाणी ३३ केव्हीचे नवीन उपकेंद्र उभारणे गरजेचे असल्याचे ग्राहकांचे मत आहे.
समस्या शोधण्यासाठी विलंब
पावसाळ्यातील ट्रिपिंग आणि खंडित वीजपुरवठा ही डहाणू तालुक्यातील सर्वात मोठी समस्या आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे, डहाणू-कासा-जव्हार-मोखाडा या साखळीतील वीजवाहिनी जवळपास १०० किमी अंतरावरून येते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल, नदी-नाले आणि डोंगराळ भाग येतात. परिणामी, कोणत्या भागात समस्या निर्माण झाली आहे, हे शोधण्यासाठी मोठा कालावधी लागतो.
डहाणू तालुक्यातील लोकसंख्या व उपकरणांची वाढ झाल्यामुळे वीजपुरवठा व्यवस्थेत व्यापक बदल होणे अत्यंत आवश्यक आहे. महावितरणने काही सुधारणा केल्या आहेत, मात्र अजूनही सुधारणा करणे गरजेचे आहे.
- आशिष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता
कासा येथे १३२ केव्ही उपकेंद्र आणि सूर्यनगर येथे जोड उपकेंद्र उभारल्यास वीजपुरवठा अधिक कार्यक्षम होईल. सध्या डोंगराळ भागातून येणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे अडचणी निर्माण होतात, परंतु या समस्यांवर लवकरच उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- गणेश दंडगव्हाळ, उपकार्यकारी अभियंता, डहाणू महावितरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.