भरीव विकासकामांमुळे जनता पुन्हा कौल देईल
वाडा, ता. ७ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून विकासकामांसाठी भरीव निधी प्राप्त झाल्याने शहापूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला जनता पुन्हा कौल देईल, असा विश्वास आमदार दौलत दरोडा यांनी व्यक्त केला.
वाडा तालुक्यातील वडवली येथील नूतन अंगणवाडी, मोज व सोनाळे येथील समाजगृहाचा उद्घाटन सोहळा रविवारी (ता. ५) आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते पार पडला. या वेळी मोज जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावाही पार पडला. या वेळी ते बोलत होते. जनतेची कामे करणाऱ्या पक्षाला मतदार नक्की साथ देतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहनही दरोडा यांनी केले.
मोज, वरई, तिलसे, पिंजाळ व अन्य ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून या पक्षाकडून वाडा तालुक्यात जोरदार तयारी सुरू असून जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मोज गटाचा मेळावा पार पडला. या वेळी कार्यकर्त्यांना पदांच्या नियुक्त्याही देण्यात आल्या. तसेच परिसरातील आदर्श शेतकरी, उद्योजक, महिला बचतगट, खेळाडू यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार, युवक सरचिटणीस मिलिंद देशमुख, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, जिल्हा युवक अध्यक्ष रोहित चक्रवर्ती, रोहिदास शेलार, विधानसभा अध्यक्ष नाना साबळे, तालुका उपाध्यक्ष भगवान भोईर, महिला जिल्हा उपाध्यक्षा चित्रा पाटील, युवक उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे यांसह अन्य तालुका पदाधिकारी उपस्थित होते.