विमानतळाचे स्वप्न साकार

विमानतळाचे स्वप्न साकार

Published on

विमानतळाचे स्वप्न साकार
पुनर्वसन, पर्यावरणविषयक अडचणींवर सिडकोची मात
पनवेल, ता. ७ (बातमीदार)ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी लोकार्पण होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी भूसंपादनापासून, पुनर्वसन, पर्यावरणविषयक मंजुरी तसेच नैसर्गिक अडथळे होते, मात्र केंद्र, राज्य सरकारच्या पाठबळावर सिडकोने विमानतळाचे स्वप्न साकार केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण करण्याचा १९९८ ला प्रस्ताव आला होता, मात्र त्याबाबत ठोस भूमिका शासनाने घेतली नाही. २००७ ला नवी मुंबई विमानतळाबाबत निर्णय घेण्यात आला. नोडल एजन्सी म्हणून सिडकोची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार १० गावांमध्ये प्रकल्प उभारणीसाठी पर्यावरणविषयक सुनावणी घेण्यात आली, मात्र विमानतळाला सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. या प्रकल्पाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी साडेबावीस टक्के विकसित भूखंडाचे पॅकेज जाहीर केले. त्या कालावधीत तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी स्थानिकांना विश्वासात घेण्यासंदर्भात विशेष प्रयत्न केले. पुनर्वसनाचे धोरण बाधितांनी मान्य केले. तत्पूर्वी शासनाची जागा विमानतळासाठी हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतरचा प्रवास फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केला. पर्यावरणविषयक मंजुरी घेण्यात आली. १८ फेब्रुवारी २०१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कोरोना काळातही अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करताना अखेर प्रकल्प पूर्णत्वास आला.
-----------------------------------------------
विविध अडचणींचा फेरा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ११६० हेक्टर जमिनीवर उभारण्यात आली आहे. येथून गाढी नदी वाहत होती, मात्र विमानतळासाठी नदीचे पात्र बदलण्यात आले. ही गोष्टसुद्धा आव्हानात्मक होती. त्याचबरोबर १० गावांनी वेढलेली उलवे खाडीसुद्धा या प्रकल्पासाठी सपाट करण्यात आली. - माती आणि दगड आठ मीटरचा भराव करण्यासाठी वापरण्यात आले. शिवाय विमानतळ उभारलेल्या जागेवर बऱ्याच ठिकाणी कांदळवन होते, मात्र त्याची पुनर्लागवड करण्यात आली. याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर विमानतळाला मंजुरी मिळाली.
- विमानतळामुळे बाधित झालेल्या हजारो कुटुंबांचे पुनर्वसन करणे ही मोठी आव्हानात्मक गोष्ट होती, परंतु सिडकोकडून करंजाडे परिसरात त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना पुष्पकनगर येथे विकसित भूखंड देण्यात आले. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात आली.
----------------------------------
नामांतराचा मुद्दा गाजला
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या अनुषंगाने काही वर्षांपासून मागणी होती. यासंदर्भात आंदोलने झाली. आघाडी सरकारच्या काळात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पुढे आले, मात्र पुन्हा दि. बा. पाटील यांच्या नावाचा आवाज घुमला. विमानतळ लोकार्पणाच्या आधी भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनीही आंदोलन केले. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींची तीच भावना होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे सांगताना दिबांचे नाव देण्याबाबत घोषणा केली.
------------------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. विविध अडचणी, अडथळे नैसर्गिकरीत्या आले. जमीन संपादन, पुनर्वसन नदी आणि टेकडी त्याचबरोबर पर्यावरणविषयक मंजुरी यासारख्या अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता, मात्र त्यावर मात करण्यात यश आले. संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ः- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक सिडको

Marathi News Esakal
www.esakal.com