ठाणे पालिकेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
ठाणे पालिकेत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन आजपासून गुरुवार (ता.९) पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, पालिका मुख्यालय, पाचपाखाडी येथे भरवण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार, ०८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
साहित्य अकादमी, मॅजेस्टिक बुक डेपो, ज्योत्स्ना प्रकाशन, अनघा प्रकाशन, शारदा प्रकाशन आदींचे पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत. प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले आहे. ठाणे महापालिकेतर्फे ३ ऑक्टोबर पासून ९ ऑक्टोबरपर्यंत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या काळात महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्नमंजुषा, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा, गद्य आणि पद्य वाचन स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याबरोबर, शालेय स्तरावर पुस्तक प्रदर्शने, ग्रंथालय भेटी हेही कार्यक्रम होणार आहेत. महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सोपी आणि सुटसुटीत कार्यालयीन मराठी या विषयावर डॉ. धनश्री लेले यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी केले आहे.