वडखळ-अलिबाग मार्ग दीडतास ठप्प
वडखळ-अलिबाग मार्ग दीड तास ठप्प
पेझारीतील शेकापच्या आंदोलनाचा वाहतुकीला फटका
पोयनाड, ता. ७ (बातमीदार) : वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरू आहे गणपती, नवरात्रोत्सव झाला तरी हे प्रशासनाने रस्ते दुरुस्ती केली नसल्याने मंगळवारी पेझारी चेकपोस्ट येथे शेकापच्यावतीने तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केले.
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. झोपलेल्या प्रशासनाला रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची काहीच चिंता नाही. आज रस्ते हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे, पण वडखळ-अलिबाग राज्यमार्गावर पडलेले खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसौय होत आहे. सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत आहे, मात्र त्याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. त्यामुळे वडखळ-अलिबाग राज्यमार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
---------------------------
पोलिसांचा फौजफाटा तैनात
राज्यमार्गासोबतच अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात, पण अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी वेढले आहेत. त्यामुळे प्रवास करणे सर्वसामान्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरले दिवाळीपर्यंत भरले नाहीत, तर खड्ड्यांमध्ये दिवे लावून सरकारचा निषेध करणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, पण आंदोलनादरम्यान शेकाप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याने मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
------------------------------------
वाहतुकीचा खोळंबा
शेकापच्या रास्ता रोको आंदोलनामुळे पोयनाडमधून अलिबागच्या दिशेने जाणारी वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. परिणामी, कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. आजूबाजूच्या मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे आंदोलन संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.